शेतीपूरक जोडधंदे करणे काळाची गरज : डॉ. मानकर

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत विविध साहित्यांचे वाटप

GADCHIROLI TODAY

गडचिरोली : ग्रामस्थ जळाऊ लाकूड, बांबू, चराई, मोहफुल, तेंदू, रानभाज्या अशा अनेक गोष्टींसाठी वनांवर अवलंबून असतात.मात्र, या नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत उपयोग घेतला पाहिजे तसेच दुधाळ गायी, कुक्कुटपालन, मत्स्यपालन अशाप्रकारचे शेतीपूरक जोडधंदे करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी केले.
मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ग्रामिणांच्या सहभागातून वनसंवर्धन करणे, गावातील संसाधनांचा शाश्वत विकास साधून पर्यायी रोजगार संधी वाढवणे व लोकांचे वनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन – वन विकास योजनेअंतर्गत गडचिरोली वनविभागाच्या वतीने विविध लोकोपयोगी साहित्याचे वनव्यवस्थापन समित्यांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. संदीप कऱ्हाळे, गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा, गडचिरोलीचे तहसिलदार गणवीर, मृद परीक्षण प्रयोगशाळा, गडचिरोलीचे बादाडे, मिलिंद उमरे उपस्थित होते.
कृपाळा, रानभूमी, चांदाळा, चातगाव, सावरगाव अशा एकूण ३८ वनव्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष व सचिव या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी वन व्यवस्थापन समित्यांना इलेक्ट्रिक रिक्षा, मळणी यंत्र, नांगर, पेरणी यंत्र, रोटावेटर, पाणी गरम करण्याचे बंब, कुक्कुटपालनचे यांसारख्या साहित्यांचे वाटप प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. सदर साहित्य लवकरच समित्यांना वर्ग करण्यात येईल, साहित्यांचा आपल्या विकासासाठी उपयोग करून घ्यावा, असे आवाहन गडचिरोलीचे उपवसंरक्षक मिलिश शर्मा यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गडचिरोली वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांनी तर आभार गडचिरोली वपरिक्षेत्राचे प्रभारी अधिकारी धिरज ढेंबरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गडचिरोली वनविभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.