मेडिगट्टा प्रकल्पातील भूसंपादन व पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने निकाली काढा – आमदार आंबटकर यांची लक्षवेधी

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : मेडिगट्टा सिंचन प्रकल्पातील भूसंपादन व  पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यात यावा, अशी मागणी विधानपरिषद आ. डॉ. रामदास आंबटकर यांनी विधानसभेतील लक्षवेधी प्रश्नातून केली.
मेडिगट्टा प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रापेक्षा तेलंगणा राज्याला जास्तीत जास्त म्हणजे 18 लाख 50 हजार एकर क्षेत्राला सिंचन होणार आहे. त्यामुळे सिरोंचा भागातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी तेलंगणा सरकारची असल्याचा मुद्दा आ. डॉ. रामदास आंबटकर यांनी विधानसभेत उपस्थित केला. मेडिगट्टा सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा परिसरातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांची वाताहात झाली आहे. भूसंपादन, पुनर्वसन असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न निकाली लावण्याच्या दृष्टीने सरकारने ठोस पाऊल उचलणे गरजेचे असून प्रकल्पग्रस्तांना मोबदला अदा करण्याची जबाबदारी तेलंगणा सरकारची असल्याची लक्षवेधी आ. आंबटकर यांनी केली.
आजमितीस भूसंपादनाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. या टप्प्यामध्ये जवळपास 1090 भूधारकांना लाभ मिळाला आहे. संयुक्त मोजणी झाली परंतु जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसलेली 12 गावे आहेत. या गावांमध्ये जवळपास एकूण 341 भूखंड आहेत आणि भूसंपादित क्षेत्र 116.23 हे. आर. आहे. मात्र घेतलेल्या माहितीनुसार 116 हे. आर. क्षेत्र अजूनही भूसंपादित झालेले नाही. यासंदर्भात तेलंगणा सरकारशी आपला पत्रव्यवहार सुरू आहे. या गंभीर व संवेदनशील प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशीही मागणी आ. डॉ. आंबटकर यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या चर्चेदरम्यान केली.