सागवान तस्करांचा वनकर्मचाऱ्यांवर दगडांचा मारा

बैलबंडीसह 31 नग सागवान लाकडे जप्त
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : मध्यरात्री सागवानाची तस्करी करणाऱ्यांनी गस्तीवरील वनकर्मचाऱ्यांवर दगडांचा मारा केला. प्रत्युत्तरा दाखल वनकर्मचाऱ्यांनीही शासकीय पिस्टुलमधून हवेत गोळीबार केल्याने तस्करांनी बैलबंडीसह सांगवान तिथेच ठेवून पोबारा केल्याची घटना 24 मार्च रोजी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील दुब्बापल्लीच्या जंगल परिसरात घडली.
प्राप्त माहितीनुसार, चिटुर ते दुब्बापल्ली जंगलात सिरोंचा वनपरिक्षेत्रातील अधिकारी, वनकर्मचारी व आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी संयुक्त गस्त राबवुन दुब्बापल्ली जंगलात पाळत ठेवले असता, रात्री 1 वाजताच्या दरम्यान दुब्बापल्लीच्या जंगलात सागवान तस्कर बैलबंडीमध्ये साग लठ्ठे भरुन येतांना दिसून आले. वनकर्मचा-यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता, तस्करांनी वनकर्मचाऱ्यांवर दंगडांचा मारा करीत हल्ला केला. तस्करांना पांगविण्यासाठी वनअधिका-यांनी शासकीय पिस्टुल मधुन हवेत गोळीबार केला असता, तस्कर बैल व बंड्या सोडुन अंधाराचा फायदा घेत जंगलात पसार झाले. त्यानंतर मोक्यावरुन 14 बैल, 7 बंडी व 31 नग साग लठ्ठे जप्त करण्यात आले. सदर कार्यवाही सकाळचे 4 वाजपर्यंत सुरु होती. जप्त केलेला माल डेपोमध्ये जमा करण्यात आला. सदर कार्यवाही सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक पुनम पाटे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एम. पाझारे, आर. डी. तोकला, वनपाल एम. बी. शेख, एस. एस. निलम, वनरक्षक आर. के. शेरकी, ए. एस. नैताम, आर. वाय. तलांडी, पी. टी. दर्रो, एम. जे. धुर्वे, वाहनचालक आर. बी. आत्राम, ए. जी. आत्राम तसेच आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील वनरक्षक आर. पी. गेडाम, ए. डब्ल्यु. तलांडी, सी. पी. दुर्गे तसेच सिरोंचा वनपरिक्षेत्रातील व आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील रोजंदारी वनमजूरांनी पार पाडली. पुढील कार्यवाही सिरोंचाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एम. पाझारे करीत आहेत.