जिल्ह्यात 2017 मध्येच पांढऱ्या नागाची नोंद : गडचिरोलीतील सर्पमित्रांची माहिती

 

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : जिल्ह्यात पांढरा नाग आढळल्याची नोंद यापूर्वी 2017 मध्ये झालेली आहे. गडचिरोलीतील सर्पमित्रांनी पहिल्यांदा पांढरा नाग गडचिरोली नजीकच्या कोटगल येथील ट्रीट आईस क्रीम फॅक्टरीमधे पकडला असल्याची माहिती सर्पमित्र व वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर यांनी दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचात नुकताच पांढऱ्या रंगाचा साप आढळला होता. हा साप ‘अल्बिनो’ या दुर्मिळ विकाराने ग्रस्त असल्याचे म्हटले जात आहे. प्रत्येक पांढरा दिसणारा साप हा अल्बिनोच असू शकतो असे नाही. अल्बिनोग्रस्त साप क्वचितच आढळून येतात. पांढरे दिसणारे प्राणी हे बरेचदा ‘ल्युसिझम’ या सामान्य आजाराने सुद्धा ग्रस्त असू शकतात. परंतु सदर साप ‘ल्युसिझम’ या आजाराने सुद्धा ग्रस्त असू शकतो. जिल्ह्यात पांढरा नाग आढळल्याची नोंद 2017 मध्ये करण्यात आली आहे. गडचिरोलीतील सर्पमित्र अजय कुकडकर, पंकज फरकाडे, विपूल उराडे, निखील बुरांडे यांनी पहिल्यांदा पांढरा नाग पकडला होता.
पांढऱ्या रंगाचे साप ‘अल्बिनिझम’ किंवा ‘ल्युसिझम’ यापैकी एका अनुवांशिक विकाराने ग्रस्त असू शकतात. ल्युसिझम हे केवळ रंगद्रव्याचे आंशिक नुकसान आहे. ज्यामुळे प्राण्याची त्वचा, केस किंवा पंख पांढरे किंवा फिकट रंगाचे होऊ शकतात. तथापि डोळ्यातील रंगद्रव्य पेशी या स्थितीमुळे प्रभावित होत नाहीत. अल्बिनिझम ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये मेलेनिनची अनुपस्थिती असते. मेलेनिन हे त्वचेमध्ये असते आणि ते त्वचेला, पंखांना, केसांना आणि डोळ्यांना रंग देते. अल्बिनिझम असलेले पृष्ठवंशी केवळ पांढरे (किंवा कधीकधी फिकट पिवळसर) रंगाचे नसतात तर त्यांचे डोळे खूप फिकट गुलाबी किंवा लाल असतात. जसे रक्तवाहिन्यांमधून दिसतात. अल्बिनिझम अत्यंत दुर्मिळ आहे तर ल्युसिझम जास्त सामान्य आहे. ज्या प्राण्यांचा रंग पांढरा असतो त्यांना अनेकदा ल्युसिझम असतो. मात्र त्यांना अल्बिनिझम असल्याचे समजले जाते. ल्युसिझम असलेल्या प्राण्यांना ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे डोळे पाहणे. ल्युसिझम असलेल्या प्राण्यांचे डोळे लाल किंव्हा गुलाबी ऐवजी गडद रंगाचे असतात. अल्बिनो आणि ल्युसिझम या दोन अतिशय भिन्न परिस्थिती आहेत. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्हाला अल्बिनो वाटणारा प्राणी दिसला की तो बहुतेक पांढरा आहे का ते पहा आणि महत्त्वाचे म्हणजे डोळ्यांकडे एक नजर टाका, असे आवाहन सर्पमित्र अजय कुकडकर यांनी केले आहे.