एक विवाह ऐसा भी’ : ८ आत्मसमर्पित नक्षल्यांसह १२७ जोडप्यांनी बांधली लग्नगाठ

पोलिस दल, मैत्री परिवार संस्थेचा उपक्रम
GADCHIROLI TODAY
गडचिरोली: गडचिरोली पोलिस दल व मैत्री परिवाराच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी शहरातील मूल मार्गावरील अभिनव लॉनमध्ये पार पडलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात ८ आत्मसमर्पित नक्षल्यांसह तब्बल १२७ आदिवासी जोडप्यांचा विवाह लावून देण्यात आला. या सामुहिक विवाह सोहळ्यामुळे गडचिरोली शहरत गजबजून गेले होते.
पोलिस दलाकडून आदिवासींच्या उत्थानासाठी दादालोरा खिडकी या उपक्रमातून विविध योजना राबविल्या जात आहेत. मागील वर्षी सामुहिक सोहळ्यात ११७ जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले होते. तर यावर्षी ८ आत्मसमर्पित नक्षल्यांसह १२७ जोडप्यांचा विवाह लावून देण्यात आला. कार्यक्रमाला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, भाजपचे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर, पोलिस विभागाचे गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ. संदीप पाटील, आयुक्त राजकमल, मैत्री परिवार संस्था नागपूरचे अध्यक्ष संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंढके, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनुज तारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा व मैत्री संस्थेचे पदाधिकारी व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ढोल ताशांच्या गजरात निघाली वरात
आदिवासी गोंडी समाजाच्या पुरातन चालीरिती व परंपरेनुसार सकाळी ९ वाजता शहरातून पारंपरिक पद्धतीने मूल मार्गावरील मंगल कार्यालयातून वरातील सुरुवात झाली. हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर वरात मुख्य बाजारपेठेतून इंदिरा गांधी चौकातून पुन्हा लग्नमंडपात पोहोचली. या निघालेल्या वरातीमळे गडचिरोली शहर गजबूजून गेले होते. ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या वरातीवर महिलांनी घराबाहेर पडून कौतुकाने वधू-वरांवर पुष्पवृटी केली. वरातील नातेवाईकांसह पोलिसांनीही ठेका धरला होता.
गोंडी मंगलाष्टानी पार पडला विवाह सोहळा
जिल्हा पोलिस दल व नागपूर येथील मैत्री परिवार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एकाच मांडवात आज पार पडलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याने गडचिरोली शहर गजबजून गेले होते. पिपाणीचा लयबद्ध सूर, ढोलताशांच्या गजरात मुलर रोडवरील मंगल कार्यालयातून वरातील होऊन हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर मुख्य बाजारपेठेतून वरात इंदिरा गांधी चौकातून पुन्हा लग्नमंडपात नेण्यात आली. त्यानंतर गोंडी मंगलाष्टके म्हणून हा सामुहिक विवाह सोहळा पार पडला.
सोहळ्याला साडेतीन हजारांवर वऱ्हाडी
मूल मार्गावरील अभिनव लॉनमध्ये आज पार पडलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यास साडेतीन हजारापेक्षा जास्त लोकांनी हजेरी लावली होती. १२७ जोडप्यांचे दहा झोनमध्ये विभाजन केले होते. मुख्य मंडपाला वीर बिरसा मुंडा, आदिवासी बांधवांच्या भोजनकक्षाला क्रातिवीर बाबुराव शेडमाके व मान्यवरांच्या भोजनकक्षाला वीर नाराय सिंह यांचे नाव तर वधू-वर भोजन कक्षास वीर राणी दुर्गावती असे नाव देण्यात आले होते.
जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य
पोलिसांनी आज पार पडलेल्या सामूहिक विवाह मंडप, जेवण व वधू-वरांचा राहण्याचा व येण्या-जाण्याचा खर्च उचलला होता. तसेच मैत्री परिवार संस्थेतर्फे वधूला डोरले, मंगळसूत्र, वधू-वरांना नवे कपडे, संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. जोडप्यांच्या आई-वडिलांना आहेर देण्यात आला. तसेच जोडप्यांना विवाह प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.