आलापल्लीतील सागवान अयोध्येसाठी रवाना

GADCHIROLI TODAY
गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील उच्च प्रतीचे सागवान जगप्रसिद्ध आहे. अवघ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्राच्या भव्यदिव्य मंदिरासाठी लागणारे काष्ठ सागवान लाकुड आल्लापल्लीकरांनी मोठ्या हर्षोल्लासात अयोध्येसाठी रवाना केले.
भाविकांनी मोठ्या प्रमाणात गोळा होत या लाकडाची विधिवत पूजा केली. त्यांनतर सजविण्यात आलेल्या वाहनावर डीजेच्या तालात शासकीय सॉ मिल ते वीर बाबुराव चौकपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील सागवानाला प्रभू श्रीरामाच्या मंदिरात लावण्याचा मान मिळाल्याने जिल्ह्यासोबतच आल्लापलीचा मान देशपातळीवर उंचावला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सागवान लाकूड विविध वस्तू दरवाजे, फर्निचर बनवण्यास जगप्रसिद्ध आहेत. अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी लागणारे दरवाजे, खिडक्या, नक्षीकाम आणि विविध शोभेची वस्तू बनविण्यास आल्लापल्ली येथील सागवानाची निवड करण्यात आली होती. अयोध्येचे राम मंदिर देशात सर्वात जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. 90 च्या दशकात देशभरातुन त्यासाठी विटा पाठविल्या गेल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राममंदिर निर्माण कार्य सुरु होताच प्रत्येक रामभक्ताने यथाशक्ती आपला खारीचा वाटा पाठविला आहे. तेथे आता गडचिरोली जिल्ह्यातील जगप्रसिध्द सागवान लाकडाचे दरवाजे व खिडक्या बनविण्यासाठी निवड झाली आहे. आलापल्ली येथील वनविकास महामंडळाच्या सॉ-मील मध्ये सागवान लाकुड गोळा करण्यात आला आहे. लाकूड प्रस्थान होत असल्याची माहिती मिळताच आलापल्ली परिसरातील भाविकांनी लाकडाचे पूजन केले. यावेळी श्रीराम समिती, व्यापारी संघटना अल्लापल्ली, गावातील प्रतिष्ठित नागरिक, श्रीराम भाविक उपस्थित होते. त्यानंतर भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा शिव मंदिर पासून अल्लापल्ली वीर बाबुराव चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या शोभयात्रेमध्ये अनेक भक्तगण सहभागी झाले होते. जय श्रीराम, जय श्रीराम या गजरात आल्लापल्ली शहर दुमदुमून गेले होते.
संसद भवनाच्या निर्मितीसाठीही वापरले होते लाकूड
यापूर्वी देखील भारताच्या नव्या संसद भवन बांधकामासाठी आलापल्ली वनक्षेत्रातून गेलेले सागवान बल्लारपूर आगारातून खरेदी करण्यात आले होते. ग्लोरी ऑफ फॉरेस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या विदर्भातील जंगलातील हे उच्च दर्जाचे सागवान आहे. संसद भवनाचे सौंदर्य खुलविण्यात अत्यंत सुबक व देखण्या लाकडाने मोलाची भर घातली आहे. आता पुन्हा एकदा अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीत आलापल्ली वनक्षेत्रातील सागवान वापरण्यात येणार असल्याने मंदिराच्या बांधकामात महाराष्ट्राचे देखील योगदान असणार आहे.
ही तर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब
अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचे दरवाजे बनविण्यासाठी महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडून गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वनक्षेत्रातील सागवान लाकूड उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आज आलापल्ली वनक्षेत्रातील शासकीय सॉमील मधून सागवान लाकूड रवाना करण्यात आले. अहेरी-आलापल्ली येथील राम भक्तांनी मोठ्या श्रध्देने भव्य शोभायात्रा काढली. यावेळी उपस्थित श्रीराम जन्मोत्सव समिती, व्यापारी संघटना, राष्ट्रीय स्वयसेवक संघ आणि प्रभू श्रीराम भक्तांशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या भागातील साहित्याची निवड होणे ही अत्यंत अभिमानाची तसेच सौभाग्याची बाब असल्याचे सांगितले.