सुसाट दुचाकीची विद्यार्थीनीला धडक

-दुचाकीस्वाराचा मृत्यू तर विद्यार्थीनी गंभीर
GADCHIROLI TODAY
कुरखेडा : सुसाट दुचाकीने महाविद्यालयीन विद्यार्थिनीला जोरदार ‌धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू तर विद्यार्थिनी गंभीर जखमी असल्याची घटना कुरखेडा -देसाईगंज मार्गावरील विद्यानगर वळणावर‌ सोमवारी ११ वाजताच्या सुमारास घडली. विनोद रमेश तोंडफोडे (३६) रा. नान्ही असे मृतकाचे नाव असून आचल जिवन कोडाप (२०) रा. मौशी ही विद्यार्थिनी जखमी आहे.
कुरखेडा येथील मुनघाटे महाविद्यालयात बिए प्रथम वर्षाला शिकणारी विद्यार्थीनी आचल जिवन कोडाप (२०) रा. मौशी ही वर्ग आटोपत महाविद्यालयातून शहराकडे वर्ग मैत्रिणीसह पायीच परत येत होती. दरम्यान, सुसाट वेगात येणाऱ्या दुचाकीने विद्यार्थीनीला मागून जोरदार धडक दिल्याने दोघेही रस्त्यावर कोसळले. या अपघातात दोघांच्याही डोक्याला, हातापायाला गंभीर दुखापत झाली. लगेच त्याना १०८ क्रमांकाचा रुग्णवाहिकेने उपजिल्हा रूग्नालयात आणण्यात आले. येथे प्राथमिक उपचारानंतर विनोद तोंडफोडे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मागील काही दिवसांपासून तालुक्यासह शहरात सुसाट धावणाऱ्या दुचाक्या चालकासह इतरांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. वेगाची स्पर्धा जिवघेणी ठरू पाहत आहे. रविवारी सुद्धा कढोली येथे दुचाकीची समोरा-समोर कारला धडक बसल्याने एका वृध्द महिलेला आपला जीव गमवावा लागला. शहरात सुद्धा विशेषतः शाळा महाविद्यालय भरण्याचा व सुटण्याच्या वेळेत येथील काही युवक मंडळी धोकादायक पद्धतीने सुसाट वेगात वाहन चालवत स्वतःसह दुसऱ्याच्या जीवावर उदार होतात. या मार्गावर सातत्याने लहान मोठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत. यांचावर प्रतिबंध लावण्याकरीता महाविद्यालयीन वेळेत पोलीस विभागाने वाहतूक शिपाई व सीसीटीव्ही कॅमेरे लावून सुसाट बायकर्सवर नियंत्रण आणावे, अशी मागणी शहरवासीयाकडून करण्यात येत आहे .