प्राणहिता नदी पात्रात गळाला लागला 38 किलोचा मासा ; मच्छी बाजारपेठेत बघ्यांची गर्दी

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : सिरोंचातील प्राणहिता नदी पात्रात तब्बल 38 किलोचा भलामोठा मासा आढळून आला आहे. हा भलामोठा मासा पहिल्यांदाच गळाला लागला असून संपूर्ण सिरोंचात सदर मासा कुतूहलाचा विषय ठरला आहे.
सिरोंचालगत प्राणहित, गोदावरी व इंद्रावती अशा बारमाही वाहणा-या नद्या आहेत. या नद्यांचे पाणी गोडे असल्याने येथे मासांना उत्तम वातावरण प्राप्त होत आले आहे. त्यामुळे या तिन्ही नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे मासे आढळून येतात. या मासेमारीवर येथील मासेमारांच्या कुटूंबियांचा उदरनिर्वाह चालत आला आहे. त्यामुळे येथील मच्छिमारांसाठी या बारमाही नद्या वरदान ठरत आले आहे. अशातच प्राणहिता नदीपात्रात तब्बल 38 किलोचा बोध जातीचा भलामोठा मासा येथील मासेमारी करणाऱ्यांच्या गळाला अडकला. सदर मासा शहरात दाखल होताच शहरवासीयांनी सदर मासा बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. पहिल्यांदाच एवढा मोठा मासा सिरोंचा दृष्टीस आल्याने या माशाला बघण्यासाठी मच्छी बाजारपेठेत शहरवासीयांनी गर्दी करीत तोंडात बोटे घातली.
सिरोंचा तालुका हा तेलंगणा व छत्तीसगड राज्याच्या सीमेवर वसलेला आहे. वनवैभवासह येथील ब्रिटीशकालीन वास्तु बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. या पर्यटकांना सिरोंचातील झिंगेही नेहमीच भूरळ घालत आले आहेत. येथे येणारा प्रत्येक पर्यटक या झिंग्याची ‘टेस्ट’ घेतल्याशिवाय जात नाही. येथील झिंगे संपूर्ण जिल्हाभरात प्रसिद्ध असून आता राज्यातील अनेक भागात झिंग्याची निर्यात केली जात आहे. त्यामुळे येथील झिंग्याने सिरोंचाला वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे.