दिल्लीच्या आंदोलनात गेलेला स्वस्त धान्य दुकानदार झाला बेपत्ता

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : विविध मागण्यांसाठी स्वस्त धान्य दुकानदारांनी थेट दिल्लीत आंदोलन केले. मात्र या आंदोलनासाठी गेलेले तालुक्यातील गहाणेगटा येथील एक दुकानदार हरवले आहेत. संतराम बुधराम पोरेटी (48) रा. गहाणेगटा असे हरवलेल्या दुकानदाराचे नाव आहे.
तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील रामलीला मैदानावर 22 मार्च रोजी आंदोलन झाले. यासाठी देशभरातून स्वस्त धान्य दुकानदार दिल्लीत दाखल झाले होते. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोरची तालुक्यतील 12 दुकानदार गेले होते. 20 मार्चला ते सर्वजण दिल्लीत पोहोचले. काही प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन सर्वजण आंदोलनस्थळी आले. मात्र बसमधून उतरल्यावर संतराम पोरेटी गायब असल्याचे निदर्शनास आले. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी विलास गुरनुले यांनी दिल्लीच्या नंदीग्राम पोलिस ठाण्यात बेपत्ताची तक्रार नोंदवली आहे. 20 मार्चपासून हरवलेले संतराम यांचा आठ दिवस उलटूनही शोध लागलेला नाही. कुटूंबिय वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. त्यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.