348 पोलिस शिपाई पदाकरिता 3307 उमेदवार देणार लेखी परीक्षा

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : जिल्हा पोलिस दलाच्या 348 पोलिस शिपाई पदाकरिता घेण्यात आलेल्या मैदानी परीक्षेअंती 3307 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. याअंतर्गत 2 एप्रिल रोजी सदर उमेदवार लेखी परीक्षा देणार आहेत.
गडचिरोली जिल्हा पोलिस दलातर्फे 348 पोलिस शिपाई पदाकरिता हजारो पुरुष व महिला उमेदवारांनी 6 जानेवारी ते 17 जानेवारी या कालावधीत पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर मैदानी परीक्षा दिली होती. मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या गुणांच्या आधारे लेखी परीक्षेसाठी 3307 उमेदवारी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या उमेदवारांची परीक्षा 2 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. यात पहिला पेपर सामान्य ज्ञान या विषयाचा असून सकाळी 8.30 ते 10 या दरम्यान पार पडणार आहे. तर गोंडी व माडीया या विषयावरील पेपर सकाळी 11 ते 12.30 या कालावधीत घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेकरिता जिल्हास्थळ असलेल्या गडचिरोली शहरातील 6 केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारांनी आपआपल्या परीक्षा केंद्रावर सकाळी 5.30 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी प्रवेशपत्र महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
जिल्हा पोलिस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने शहरातील 6 केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये शिवाजी हायस्कुल तथा विज्ञान महाविद्यालय गोकुळनगर, शिवाजी इंग्लिश अकॅडमी स्कुल गोकुळनगर, शासकीय विज्ञान महाविद्यालय चामोर्शी रोड, शिवाजी महाविद्यालय धानोरा रोड, महिला महाविद्यालय चंद्रपूर रोड, फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क चंद्रपूर रोड आदी केंद्रावर परीक्षा पार पडणार आहे. सर्व उमेदवारांची परीक्षा केंद्रावर बायोमॅट्रीक पद्धतीने नोंदणी करुन परीक्षा केंद्रावर सोडण्यात येणार आहे. उमेदवारांकरीता परीक्षा केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून पेन, पॅड उपलब्ध करुन देण्यात येणार असून दुस-या पेपरच्या मधल्या काळात उमेदवारांकरिता नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा कक्षात बॅग, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली असून तसे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
प्रलोभनाला बळी पडू नका – पोलिस अधीक्षक
उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा अमिषाला बळी पडू नये, तसेच कुणी आमिष किंवा प्रलोभन देत असल्यास पोलिस अधीक्ष कार्यालय गडचिरोली येथील समाधान कक्ष दुरध्वनी क्र. 88063312100 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.