एकाच अर्जाद्वारे शेतकऱ्यांना मिळणार विविध कल्याणकारी योजनांचा लाभ : महाडीबीटी अंतर्गत 20.77 कोटी अनुदान वितरीत

1800 शेतकऱ्यांना मिळाला कृषी योजनांचा लाभ
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची जलद गतीने व पारदर्शक पध्दतीने अंमलबजावणी व्हावी आणि शेतक-यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच खिडकीद्वारे पोर्टलच्या सहाय्यातून मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने महा-डीबीटी हे संकेतस्थळ विकसीत केले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जवळपास 1800 शेतक-यांना सन 2021 ते 23 या दोन वर्षामध्ये 20 कोटी 77 लाख 94 हजार 44 रूपयांचे अनुदान देण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात आधुनिक शेती व नगदी पिकांसाठी शेतकरी जोमाने काम करीत असल्याचे यावरून स्पष्ट होते.
महा-डीबीटी हे एकात्मिक संगणक प्रणाली असून एक खिडकी योजनाच आहे. यामुळे या योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि एकसूत्रता आली आहे. महा-डीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, शेततळे खोदकाम, शेडनेट योजना, पॉलीहाउस, पॅक हाऊस, कांदाचाळ व शेततळे अस्तरीकरण या घटकांसाठी अनुदानाची सुविधा आहे. या व्यतिरीक्त ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली, पॉवर टिलर, पॉवर विडर, रोटाव्हेटर, कल्टीव्हेटर, नांगर, खते व बियाणे पेरणी यंत्र, पाचट कुट्टी, मल्चर, श्रेडर, ट्रॅक्टर ऑपरेटेड ब्लोअर, धान्य मळणी यंत्र, डाळ मिल, कंम्बाईन हार्वेस्टर, इनफिल्डर, प्लास्टीक पेपर मल्चींग, कोल्ड स्टोरेज, रायपनिंग चेंबर व प्रक्रिया युनिट आदी घटकांसाठीही शेतक-यांना अर्ज करता येतो.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या सहाय्याने सदर लाभ एका अर्जद्वारे महाडीबीटी पोर्टलद्वारे वितरीत केला जातो. यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना, मुख्यमंत्री शाश्वत शेती सिंचन योजना (सामुहिक/वैयक्तिक), डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, फलोत्पादनाच्या एकात्मिक विकासासाठी अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-कडधान्य, पौष्टीक तृणधान्य व तांदूळ, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजनेत-कृषी यांत्रिकीकरण, कांदा साठवणूक सुविधा, शेततळ्यांना कागदी आच्छादन, संरक्षित लागवड, भाजीपाला रोपवाटीका, अनुसूचित घटकासाठी नवीन विहीर इत्यादी, राज्य कृषि यांत्रिकीकरण, उप योजना कृषी यांत्रिकीकरण तेलबिया लागवडीत वाढ करणे इत्यादी.
अशी आहे प्रक्रिया
शेतक-यांयांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरून स्वत:च्या मोबाईलवरून, संगणक अथवा सामुदायिक सुविधा केंद्रावरून तसेच ग्रामपंचायत संग्राम कक्षामधून अर्ज करावा. त्यानंतर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व अर्जाची सोडत काढण्यात येते. निवड झालेल्या शेतक-यांना आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करण्यासाठी संदेश पाठविला जातो. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पात्र शेतक-यांना महा-डीबीटी पोर्टलवर पुर्वसंमती देण्यात येते. सुचीत केलेल्या कालावधीत निवड झालेल्या बाबींची शेतक-यांना बाजारपेठेतून आपल्या पसंतीच्या उत्पादकाच्या अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करून देयकाची छायांकित प्रत महाडीबीटी पोर्टलवरती अपलोड करायची आहे. यानंतर अनुदान शेतक-यांचा खात्यात जमा होते.
10 वर्षात फलोत्पादन योजनेवर 1 कोटींवर खर्च
गेल्या 10 वर्षात पहिल्या फलोत्पादन योजनेवर 1 कोटी पेक्षा जास्त खर्च गडचिरोली जिल्ह्यात झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात फळबाग योजनेत काजू लागवडीचे विशेष पीक घेण्यात आले आहे. जिल्ह्यात महाडीबिटी या कृषी योजनेंतर्गत ट्रॅक्टर-395- 5 कोटी रुपये, औजारे – 285- 1.88 कोटी रुपये, सिंचन सुविधा विहिरी व शेततळे- 700- 9 कोटी रुपये, कांबाइन हार्वेस्टर-14 – 1.5 कोटी रूपयांचे अनुदान शेतक-यांना वितरण करण्यात आले आहे.