श्रीरामनगरात निघाली भव्य शोभायात्रा

GADCHIROLI TODAY
चंद्रपूर : तालुक्यातील खुटाळा / मोरवा येथील श्रीरामनगरात श्रीरामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विशेष म्हणजे, श्रीराम, लक्ष्मण, सिता, बाल हनुमानाची व्यक्तिरेखा साकारलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
या वॉर्डातील लोकांनी सामूहिक निधीतून श्रीराम मंदिर बांधकामाची सुरुवात केलेली आहे. यावर्षी श्रीरामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा काढण्याचे नियोजन वॉर्डातील सर्व लोकांनी केले होते. सर्वांच्या सहकार्याने भव्य शोभायात्रा रथ तयार करण्यात आला. रथामध्ये श्रीराम, लक्ष्मण, सिता, छोटे बाल हनुमान, लव कुश यांच्या व्यक्तिरेखा साकारण्यात आल्या. त्यामध्ये अर्श, आध्या, गार्गी, प्रिशा, कैवल्य, कनिष्क, रुद्र, आरोही आदी मुलामुलींनी सहभाग घेतला होता. नागाळा, खुटाळा, मुरसा, दुर्गापूर येथील भजन मंडळांनी शोभायात्रेची शोभा वाढवली होती. जवळपास 400 ते 500 लोकांनी श्रीराम शोभायात्रेत सहभाग नोंदविला होता. अतिशय भक्तिमय वातावरणात श्रीराम नगर, अबोली अपार्टमेंट, नागपूर रोड, पडोली चौक, घूग्गुस रोड, लोकसेवा कार्यालय बाजूने पूर्वस्थळ श्रीरामनगर अशी भव्यदिव्य शोभायात्रा पार पडली. ठिकठिकाणी शोभायात्रेसाठी मसालेभात , थंड पेय यांची व्यवस्था पडोली येथील दुकानदारांनी केली होती. भक्तिमय वातावरणात निघालेल्या पहिल्याच शोभायात्रेची चर्चा दिवसभर परिसरात होती.
शोभायात्रेसाठी प्रमुख उपस्थिती खुटाळाच्या सरपंच ऋतिका नरुले, पडोलीचे सरपंच विकी लाडसे, सामाजिक कार्यकर्ते मनोज ठेंगणे, मुकेश साळवे , भाग्यवान गणफुले, अनिल नरुले, अनुताई ठेंगणे, राजेश कुबेर, विलास कुमरवार, रोहित जोगराणा आदींची होती. या शोभायात्रेसाठी श्रीरामनगर येथील रहिवाशी मधुकर मोहुर्ले, जलील शेख, नाजूकराव मोहुर्ले, विजय सोनवणे, सतीश देवतळे, बाळकृष्ण थेरे, सुनील वाघमारे, आशिष लेनगुरे, दयानंद नागरकर, अभय दुर्गे, संभाजी मोरे, राहुल दिवटे, नुर शेख, सुशांत मुनगंटीवार आदींनी अथक परिश्रम घेतले होते.