हिकेर जंगल पहाडीवर चढून सी-६० जवानांनी राबविले अभियान : कंपनी दलमच्या एका जहाल नक्षल्याचा खात्मा

६० ते ७० नक्षलवाद्यांनी जवानांवर केला अंदाधुंद गोळीबार
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या गट्टा (जां.) हद्दीतील हिक्केर जंगल परिसरातील पहाडीवर ६० ते ७० नक्षलवाद्यांच्या अंदाधुंद गोळीबाराला प्रत्युत्तर देत एका जहाल नक्षल्याचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिस दलाच्या सी-६० जवानांना यश आले आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य हस्तगत करण्यात आले असून शोधमोहीम सुरु आहे. समीर ऊर्फ साधु लिंगा मोहंदा, वय ३१ वर्षे, रा. तुमरकोडी, पोमकें कोठी, ता. भामरागड असे ठार झालेल्या नक्षल्याचे नाव असून त्याच्यावर शासनाने दोन लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.
गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष अभियान पथकाने शोध अभियान राबविले असता, १ एप्रिलच्या सकाळी १० वाजेच्या सुमारास उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या गट्टा (जां.) हद्दीतील हिक्केर जंगल परिसरातील पहाडीवर सुमारे ६० ते ७० नक्षलवाद्यांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने बीजीएल व इतर दारुगोळ्याच्या साह्याने तीव्र स्वरुपात अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलीसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले असता, नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणासाठी नक्षलवादयांच्या दिशेने गोळीबार केला. सदरची चकमक ही सुमारे ३० ते ४५ मिनीटे चालु होती. पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर एक पुरुष नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला. मृत नक्षलीची ओळख पटली असून त्याचे नाव समीर ऊर्फ साधु लिंगा मोहंदा आहे.
सदर अभियान पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे , अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. सी-६० कमांडोच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतुक केले. तसेच नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून सर्व नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण होऊन आपले जिवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे.
ठार झालेल्या नक्षल्यावर ४ गुन्हे दाखल
समीर ऊर्फ साधु लिंगा मोहंदा या मृतक नक्षल्यावर आजपावेतो २ चकमक व २ इतर असे ४ गुन्हे दाखल असून त्यामध्ये पोस्टे भामरागड येथे सन – २०१८ साली पोलीसांना जिवे मारण्यासाठी ॲम्बुश लावणे यासाठी देखील गुन्हा दाखल आहे. सदर नक्षल सन २०१४-१५ साली चातगाव दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन २०१७ साली प्लाटुन क्र. ७ मध्ये भास्कर चा सुरक्षा गार्ड होता. तसेच सन २०१८ साली कंपनी ४ मध्ये कार्यरत होता व त्यानंतर कंपनी क्रमांक १० मध्ये कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने २ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणात नक्षल साहित्य जप्त
घटनास्थळावर १ नग देशी बनावटीची रायफल, १ नग भरमार रायफल, १ नग ३०३ रायफल, ब्लास्टींगचे साहित्य, एसएलआर च्या २ मॅगझिन व ३० राऊंड्स, ८ एम.एम.रायफलचे ३ राऊंड्स, १२ बोरचे ४ राउंड्स, २ पिट्टु, भरपुर प्रमाणात नक्षल लिखाण साहित्य, १ सॅमसंग कंपनीचा टॅब्लेट, १ रेडिओ, रोख रक्कम रुपये ३८,१२० रुपये, नक्षल कपडे व ईतर नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे. सदर जंगल परिसरात सी-६० पथकांच्या जवानांचे नक्षलविरोधी अभियान आणखी सुरु असुन, जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबविण्यात येत आहे. गडचिरोली पोलीस दलाकडुन गुन्हा नोंद करण्यासंबंधीची प्रक्रिया सुरु आहे.