सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा काम केंद्र सरकारचा – डॉ. उसेंडी ; नागपूर येथील आंदोलनात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा सहभाग

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : सर्वसामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याचा व जाती- धर्मामध्ये अराजकता माजवण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरून, भाजप सरकारने सुडबुद्धीने त्यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ नागपूर येथील संविधान चौकात काँग्रेसच्या एसटी, एससी, ओबीसी, मायनोरिटी सेलच्या वतीने भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून असे मत त्यांनी व्यक्त केले. सदर आंदोलनात माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
यावेळी आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शिवाजीराव मोघे, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, ओबोसी सेलचे राष्ट्रीय समन्वयक गोविंद भेंडारकर, ओबीसी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजा चिलाटे, अल्पसंख्यांकचे नेते वसीम खान, काँग्रेस नेते जेसा मोटवानी, चिमूर विधानसभा क्षेत्राचे ओबीसी युवा नेते फजल रहमान, अनुजाती काँग्रेसचे राहुल घरडे, प्रदीप मसराम, दशरथ मडावी, संजय दुधे, दिलीप मडावी, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष छगन शेडमाके, काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल कोठारे, प्रा. दौलत धूर्वे, पिंकु बावणे, मनोज ढोरे, पुरुषोत्तम गेडाम, संजय गावडे, पंकज खोबे, दत्तात्रेय करंगामी, किशोर चापले यांच्यासह विदर्भातील काँग्रेसचे विविध सेलचे अध्यक्ष, प्रतिनिधि उपस्थित होते.
सर्वसामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याच काम मोदी सरकार करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. भाजपाचे सरकार येऊन नऊ वर्ष झाली तरी त्यांच्या कार्यकाळात प्रचंड महागाई वाढली आहे. जाती- धर्मामध्ये अराजकता माजवण्याचे काम हे सरकार करत आहे. असा आरोप कदम यांनी केला. तर आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शिवाजीराव मोघे म्हणाले की, राहुल गांधींच्या खासदारकीचे सदस्यत्व रद्द झाले हे पाहता हा देश हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करत आहे. २०२४ ची निवडणूक ही हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी होईल. सरकारच्या विरोधात जो बोलतो तो देशद्रोही ठरतो आहे. अशा पद्धतीने वातावरण या देशात या आगोदर कधीही नव्हते. भारतीय संविधान या गोष्टीना मान्यता देत नाही. पक्ष आणि देश या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पक्षाविरोधात बोललं म्हणजे देशाविरोध बोलणं हे कधी पासून व्हायला लागल? अस म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. हे सरकार म्हणजे हम दो हमारे दो असे आहे (नरेंद्र मोदी आणि अमित शहा, अदानी आणि अंबानी) अशी टीका आंदोलनकर्त्यांनी केली आहे. सोबतच पहिले लडे थे गोरे से अब लडेंगे चोरो से अशी घोषणाबाजी आंदोलनकर्त्यांनी दिल्या.