विद्युत तारांच्या स्पर्शाने दोन म्हशींचा मृत्यू

आर्थिक मदतीची मागणी
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारांना स्पर्श होवून दोन म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील मुरखळा (माल) येथे रविवारला घडली. यामुळे शेतकरी दिलीप सातपुते यांचे मोठे नुकसान झाले असून भरपाईची मागणी केली जात आहे.
मुरखळा (माल) येथील शेतकरी दिलीप गणपती सातपुते यांनी आपल्या मालकीच्या दोन म्हशी नेहमीप्रमाणे चरावयास शेतशिवारात नेल्या होत्या. दरम्यान, म्हशी चरत असताना तुटून खाली पडलेल्या विद्युत तारांना म्हशींचा स्पर्श झाला. यातच दोन्ही म्हशी घटनास्थळीच ठार झाल्या. याची माहिती चामोर्शी पोलिस स्टेशनला देण्यात आली. पोलिस हवालदार राजेश गणवीर, पोलिस शिपाई सुरेश तांगडे, सरपंच भास्कर बुरे, गणपती सातपुते, शेतकरी दिलीप सातपुते यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. म्हशींचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे जवळपास 85 हजारांचे नुकसान झाले आहे.