कारच्या भीषण अपघातात दुचाकी जळून खाक ; एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर

GADCHIROLI TODAY
आरमोरी : तालुक्यातील देऊळगाव येथील पेट्रोलपंपासमोर 3 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकी जळून खाक झाली. या घटनेत दुचाकीवरील एक जण ठार झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. संजय माधव धनकर (40) रा. वैरागड असे मृतकाचे नाव आहे. तर सोपान हनुजी बावणे (21) रा. वैरागड, सुरेश नवघडे (50) रा. गणेशपूर (शिर्शी) अशी जखमी दुचाकी चालकांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, क्रेटा कार क्र. एम. एच. 32 एएच 6677 हे वाहन आरमोरीवरुन गडचिरोली जात होते. तर विरुद्ध दिशेने तिघेजण दुचाकीवरुन आरमोरीकडे जात होते. दरम्यान देऊळगावजवळील पेट्रोलपंपासमोर चारचाकी वाहनाने एका दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात समोरुन येत असलेल्या दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघाताची दुचाकी रस्त्यावरच जळून खाक झाली. दरम्यान दुचाकीवरील जखमी तिघांनाही रस्त्याच्या कडेला आणण्यात आले. तर चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक दिल्याने कारचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. या अपघातात दुचाकीवरील सोमेश्वर बावणे, गणेश नवघरे व संजय धनकर तिघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती प्राप्त होताच आरमोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठित जखमींना तत्काळ आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिघांनाही ब्रम्हपूरी येथे नेण्यात आले. मात्र वाटेतच संजय धनकर यांचा मृत्यू झाला. अधिक तपास आरमोरी पोलिस करीत आहेत.