2.12 लाख लाभार्थ्यांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’

2.12 लाख लाभार्थ्यांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’
– जिल्हाभरातील 1197 रास्त दुकानातून वितरण सुरु
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील पात्र शिधा पत्रिकाधारकांना गुढीपाडवा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील बारा तालुक्यातील 1197 रास्त भाव दुकानातून तब्बल 2.12 लाख पात्र लाभार्थ्यांना 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा मिळणार असून या जिन्नस संच वितरणाचे काम जिल्हा अन्न पुरवठा विभागाद्वारे युद्ध पातळीवर सुरु आहे.
पात्र लाभार्थ्यांना नियमित अन्नधान्याव्यतिरीक्त ‘आनंदाचा शिधा’ (शिधाजिन्नस संच ) रास्तभाव दुकानामार्फतीने 100 रूपयांमध्ये वाटप करण्याचे‍ काम सुरु झाले आहे. जिल्ह्यातील बाराही तालुक्यात रास्त भाव दुकानांद्वारे 98622 अंत्यांदय अन्न योजनेतील शिधा पत्रिकाधारक व 1 लाख 13419 प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधा पत्रिकाधारक असे मिळून जिल्ह्यातील 2 लाख 12 हजार 41 शिधा पत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे. याअंतर्गत प्रति शिधापत्रिका 1 किलो रवा, 1 किलो चणादाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या 4 शिधा जिन्नसांचा संचात समावेश आहे. गडचिरोली तालुक्यातील चांदाळा येथील रास्तभाव दुकानात जिल्हा पुरवठा अधिकारी दर्शन निकाळजे, पुरवठा निरीक्षक एस. एम. पतंगे, सचिन रामटेके यांचे हस्ते शिधा जिन्नस किट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.