निराश शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

GADCHIROLI TODAY
कुरखेडा : सततच्या भारनियमनामुळे उन्हाळी धान पिकाला पुरेसे पाणी होत नसल्याने शेतात भेगा पडल्या आहेत. त्यामुळे निराश होत शेतकऱ्याने गळफास घेवून शेतातच आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कुंभीटोला येथे सोमवारला घडली. देवराव मानकू नैताम (56) रा. कुंभीटोला असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, देवराव नैताम यांनी पाच एकरात उन्हाळी धान पिकाची लागवड करून दीड महिन्यापूर्वी रोवणी केली. सध्या धानाला पाण्याची नितांत गरज आहे. मात्र सततच्या भारनियमनामुळे पिकाला पुरेसे पाणी होवू शकत नाही. त्यामुळे शेतजमिनीला भेगा पडल्या आहेत. तसेच रोवणी केलेल्या धान्याला वेळेवर युरिया खत मिळू शकले नाही. त्यामुळे ते निराश होते. अशातच मंगळवारला देवराव नैताम यांनी सकाळी आपल्या मुलाला कुरखेडाला कामानिमित्त पाठवून आपण घरुन दोर घेवून शेतावर गेले. दुपारच्या वेळेस आजुबाजुच्या शेतात कुणीही नसल्याचे पाहून स्वत:च्या शेतातीलच पळसाच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. याची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी शेताकडे धाव घेत घटनेची माहिती कुरखेडा पोलिसांना दिली. घटनेचा पुढील तपास कुरखेडा पोलिस करीत आहेत.