कंटेनर-ट्रकची धडक ; कंटेनरचे ब्रेक फेल ठरले दुचाकीस्वारांसाठी काळ

GADCHIROLI TODAY
कुरखेडा : कंटनेर-ट्रकच्या भीषण अपघातात या दोन वाहनांच्या मधात आलेल्या दुचाकीवरील दोघे ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना कोरची-कुरखेडा राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत येत असलेल्या बेडगाव घाटात 5 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास घडली. रामदास कुंजाम (45), नागसु दुर्गम कुंजाम (60) रा. मालेवाडा असे ठार झालेल्यांची नावे असून रमेश नागसू कुंजाम (35) रा. मालेवाडा असे जखमीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार कोरची तालुक्यातील नांदळी येथील सुनहेर बिरजू कुमरे यांच्याकडे बहीण जावयाची तेरवी निश्चित करण्यासाठी मालेवाडावरुन नागसू कुंजा, रमेश कुंजाम व रामदास कुंजाम हे तिघेही दुचाकी क्र. एम. एच. 33 डी. 9196 या क्रमांकाच्या दुचाकीने नांदळी येथे गेले होते. दरम्यान, मालेवाडाकडे परत येत असतांना कोरची-कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील बेडगाव घाटावत छत्तीसगडवरुन कुरखेडाच्या दिशेने जात असलेल्या कंटनेर क्र. सी. जी. 04 एनटी 1113 चे ब्रेक फेल झाल्याने उतारावर सुसाट झालेल्या कंटेनरने दुचाकीला मागून धडक दिली. यात नागसू कुंजाम व रामदास कुंजाम हे दोघेही जागीच ठार झाले. तर दुचाकीचालक रमेश कुंजाम किरकोळ जखमी झाला. दुचाकीला चिरडल्यानंतर सदर कंटेनरने परत देवरीकडे जात असलेल्या एम. एच. 14 एचयू 1862 ट्रकला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा अक्षरश: समोरचा भाग चेंदामेंदा झाला. तर लांबलचक असलेले कंटेनर रस्त्यावरच उलटल्या गेले. अपघातानंतर दोन्ही अवजड वाहनांवरील चालक घटनास्थळावरुन पसार झाले. घटनेची माहिती प्राप्त होताच पुराडा पोलिस ठाण्याचे अधिका-यांनी पथकासह घटनास्थळ गाठित पंचनामा केला. अधिक तपास कुरखेडा उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुराडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भूषण पवार यांच्या नेतृत्वात सुरु आहे.