पत्नीने डोक्यावर मुसळ मारून पतीला धाडले यमसदनी

सिरोंचा तालुक्यातील कोर्ला येथील घटना
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : पैशाच्या कारणावरुन पती-पत्नीत वाद निर्माण झाला. वाद इतका विकोपाला गेला की, पत्नीने पतीच्या डोक्यात मुसळ मारुन त्याला यमसदनी धाडल्याची घटना आसरअल्ली पोलिस स्टेशनअंतर्गत येणा-या कोर्ला येथे 4 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने सिरोंचा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. शंकर लस्मय्या दुर्गम (40) रा. कोर्ला ता. सिरोंचा असे मृतक पतीचे तर सुशिला शंकर दुर्गम (35) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, शंकर दुर्गम व त्याची पत्नी सुशिला दुर्गम यांच्यात मंगळवारला दुपारच्या सुमारास पैशाच्या कारणावरून वाद निर्माण झाला. वाद इतका विकोपाला गेला की, पत्नीला राग अनावर झाल्याने तिने पतीच्या डोक्यात मुसळ मारला. त्यामुळे पती रक्ताच्या थारोळ्यात जागीच गतप्राण झाला. घटनेची तक्रार शंकरचे वडिल लस्मया दुर्गम (65) यांनी आसरअल्ली पोलिस स्टेशनला दिली. तक्रारीवरून आसरअल्ली पोलिस स्टेशनचे पोउपनि तानाजी बहिरम, पातागुडम पोमकेचे पोउपनि बालाजी लोसरवार यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून रात्री पत्नी सुशिला दुर्गम हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, आज आसरअल्ली पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली. गुरुवारला तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास पातागुडम पोमकेचे पोउपनि बालाजी लोसरवार करीत आहेत.