जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी : शनिवारपर्यंत धोका कायम

-शेतपिकांना फटका
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतपिकांना फटका बसला असून पुन्हा 8 एप्रिलपर्यंत अवकाळीचा धोका कायम आहे.
मागील पंधरवड्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील धान, मका, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी वादळी वारा व गारपीटीसह आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतात जमा केलेले पीक पावसामुळे भिजले होते. त्यानंतर आता पुन्हा गुरुवारी जिल्ह्यातील भामरागड तालुक्यासह विविध भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना काहीशा प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारी सकाळपासूनच ढगाळी वातावरण निर्माण झाले होते. सोबतच सकाळी व सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील काही ठिकाणी अवकाळीने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. काढणी केलेले उत्पादन वाचविण्यासाठी शेतकरी हालचाल करतांना दिसून येत होते. पुढील दोन दिवस 7 व 8 एप्रिल रोजी सुद्धा जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळ वारा येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून शेतकऱ्यांमध्ये भीती कायम आहे.
जिल्ह्यातील ठिकठिकाणी गुरुवारपासून शनिवारपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता हवामान केंद्राने वर्तवली होती. या अंदाजानुसार अवकाळीने गुरुवारी हजेरी लावून शेतकऱ्यांना चांगलाच घाम फोडला आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार शुक्रवारी एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, वादळ वारा आणि गारा पडण्याची शक्यता आहे. तसेच शनिवारी सुद्धा एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळ वारा येण्याचा इशारा दिला आहे.
नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना
पुढील चार दिवसात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेतकऱ्यांनी फळबाग व भाजीपाला पिकांचे नुकसान टाळण्यासाठी परिपक्व झालेल्या पिकांची तोडणी करावी. शेतातील पीक किंवा उत्पादन पॉलिथिन शीटने झाकून ठेवावे. जनावरांना ट्रॅक्टर व इतर धातूच्या उपकरणापासून दूर ठेवावे. विजांच्या ठिकाणाचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी ऍपचा वापर करावा. असे आवाहन जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राने केले आहे.