चौथा टप्प्याच्या मोहीमेस प्रारंभ ; वंचित बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : जिल्ह्यात गोवर संसर्गजन्य आजाराची साथ नाही. परंतु सद्य:स्थितीत राज्यातील काही भागात गोवरसदृश लक्षणांचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर गोवर-रुबेला लसीकरणापासून वंचित बालकांसाठी मोहिमेचा चौथा टप्पा मंगळवारपासून सुरू करण्यात आला. येत्या 10 एप्रिलपर्यंत ही मोहिम राबविली जाणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्देशित केल्यानुसार गोवर – रुबेला विषाणू संसर्गच्या पार्श्वभूमीवर विशेष लसीकरण राबविण्याचे निर्देश प्राप्त झाले होते. त्यानुसार पहिली फेरी 15 ते 25 डिसेंबर 2022, दुसरी फेरी 15 ते 25 जानेवारी 2023 व तिसरी फेरी 4 ते 10 मार्च या कालावधीत पार पडली. आरोग्य प्रशासनाकडून अतिजोखमीच्या कार्यक्षेत्रातील जसे वीटभट्टीतील, जंगलव्याप्त गावे, रस्ता नसलेली गावे, स्थलांतरित मजूर, वीट्टाभट्टीतील घरांना भेट देऊन पर्यवेक्षण करुन 9 महिने ते 5 वर्षांपर्यंतच्या वंचित बालकांचा शोध घेऊन लसीकरण करण्यात आले. 0 ते 6 महिन्यांपर्यतच्या बालकांना मातेच्या दुधातून रोगप्रतिकारक शक्ती प्राप्त होते. त्यामुळे त्यांना धोका नसतो. परंतु 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना गोवर-रुबेला लसीकरण करणे गरजेचे आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी कळविले आहे. तसेच वंचित बालकांसाठी ही चौथी विशेष शोध व लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. वंचित बालकांना लसीकरण करुन सुरक्षित केले जाणार आहे, असे जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांनी सांगितले आहे.