शेतकऱ्याच्या घरातून 74 सागवान पाट्या जप्त ; मुरुमगाव वनपरक्षेत्र कार्यालयाची धडक कारवाई

GADCHIROLI TODAY
धानोरा : एका शेतक-याच्या घरातून 74 सागवान पाट्या तसेच बॉटम जप्त केल्याची कारवाई तालुक्यातील पन्नेमारा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या होचेटोला येथे शनिवार मुरुमगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाने केली.
धानोरा तालुक्यातील मुरुमगाव वनपरिक्षेत्र (पश्चिम) वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र सिंदेसूर येथील हीचेटोला गावानजीक असलेल्या चिन्नू नवसुर हलामी यांचे राहते घरी साग वृक्षाच्या पाट्या असल्याची गुप्त माहिती वनरक्षक ढोने यांना मिळाली. या माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश भडांगे यांचे नेतृत्वात क्षेत्र सहाय्यक पद्माकर देशपांडे, वनरक्षक बी. के. ढोने यांच्य पथकाने शनिवारी चिन्नू हलामी यांच्या राहते घराची झडती घेती असता घरात सागवनाच्या 74 पाट्या आढळून आल्या. मोका पंचनामा करुन सदर माल जप्त करण्यात आला. आरोपी चिन्नू हलामी यांची अधिक चौकशी केली असता सदर माल हा मनोहर मंगेराम तुलावी यांच्या मालकीच्या शेतातील असल्याचे त्याने सांगितले. अधिक तपास सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश भंडागे करीत आहेत.