‘या’ ठिकाणी लघुशंकेसाठीही मोजावे लागतात पैसे

GADCHIROLI TODAY
देसाईगंज : स्थानिक नगर पालिकेने बाजार भागात लाखो रूपये खर्च करून नागरिकांच्या सोयीकरीता सुलभ शौचालयाचे बांधकाम केले. मात्र सदर सुलभ शौचालयात मुतारी करीता 2 रुपये दर आकारण्यात येत आहेत. नगर परिषदेने 2 रूपये न घेता मुतारी मोफत करावी, अशी मागणी युवक काँग्रेसने उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक तसेच मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
नुकतेच देसाईगंज नगर पालिकेने बाजार विभाग, सब्जी मंडीतील भाजी विक्रेते व शेतकरी, जवळचे दुकानदार, शहरातील नागरिकांसाठी आरमोरी मार्गावर जुन्या नप प्राथमिक शाळेच्या जागेवर लाखो रूपये खर्च करून सुलभ शौचालयाचे बांधकाम केले. सदर सुलभ शौचालय मागील महिन्यात नागरिकांकरीता सुरू करण्यात आले. परंतु शौचालय सुरू झाल्यापासून तेथे मुतारीकरीता जाणाऱ्यांची संख्या निम्मी दिसत आहे. सुलभ शौचालयात आंघोळीकरीता 10 रूपये, शौचाकरीता 5 रूपये तर मुतारीकरीता 2 रुपये शुल्क आकारणे सुरू करण्यात आले आहे. आंघोळ व शौचाकरीता घेण्यात येणा-या शुल्कास कोणालाच काही त्रास नाही. परंतु मुतारीकरीता 2 रूपये देणे सामान्य व गोरगरीब नागरिकांना तसेच बाजार विभागातील व्यावसायिकांना परवडत नाही. त्यामुळे मुतारीकरीता घेण्यात येणारे 2 रूपये रद्द करून मुतारी मोफत करावी, जेणे करून सर्वसामान्य व शेतकरी वर्गाला याचा फायदा होईल, अशी मागणी युवक कॉंग्रेसने निवेदनातून केली आहे.
निवेदन देताना युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पंकज चहांदे, शहर अध्यक्ष विक्की डांगे, तालुका सचिव आक्रोश शेंडे, तालुका काँग्रेस कमिटीचे सचिव जगदिश शेंद्रे, महासचिव विलास बन्सोड, तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष अरुण कुंभलवार, माजी उपसरपंच नरेंद्र गजपुरे, शिशुपाल वालदे, दिपेश रंधाये, मनीष सडमाके, जगदिश धांडे, संकल्प वासनिक, पवन खोब्रागडे, चांद बंसोड, अविनाश अनोले आदी उपस्थित होते.