अवैध सागवान तस्करीवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र- तेलंगाना वनविभाग एकत्र

आंतरराज्यीय समन्वय बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : सिरोंचा वनविभाग अंतर्गत विभागीय कार्यालयातील प्राणहिता सभागृहमध्ये साग तस्करी व अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी आंतरराज्यीय (महाराष्ट्र- तेलंगाना) समन्वय सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अवैध सागवान तस्करी थांबवण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
तस्कर महाराष्ट्रातील सागवान माल अवैध वृक्षतोड करुन गोदावरी नदीपात्रातुन तेलंगाना राज्यात पाठवित असतात आणि तोच सागवान माल उचलून तेलंगानातील तस्कर रस्तामार्गे इतरत्र ठिकाणी विक्री करित असतात. त्यामुळे सागवान तस्करीवर आळा घालणे गरजेचे असल्यामुळे सिरोंचा वनविभागाच्या पुढाकारातुन आंतरराज्यीय समन्वय सभेचे आयोजन करण्यात आले. समन्वय सभेमध्ये अवैध सागवान तस्करीवर चर्चा आणि तस्करीवर आळा घालण्यासाठी दोन्ही राज्यांनी मिळून उपाययोजना कशा पद्धतीने करता येईल यावर सविस्तर मार्गदर्शन अधिकारी यांनी केले. तसेच गुप्त बातमीचे जाळे पसरवून दोन्ही राज्यातील वनकर्मचारी यांचे व्हॉट्सप ग्रुप तयार करुन ज्या मार्गाने मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होते, त्या मार्गावर सागवान तस्करी रोखण्यासाठी वनकर्मचाऱ्यांची संयुक्त गस्त मोहीम राबविणे, तस्करी रोखण्यासाठी स्थानिक लोकांकडून वनकर्मचारी यांना कोणत्या प्रकारच्या समस्या येतात आणि त्या समस्या सोडविण्याकरिता कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करावयाचे आहेत, याबाबत चर्चा करण्यात आली.
सभेमध्ये जयशंकर भुपालपल्लीचे जिल्हा वन अधिकारी बी. लावण्या यांनी महाराष्ट्रातुन तस्करी होवून कुठे-कुठे सागवान माल लपवून ठेवला जावू शकतो अशा सर्व ठिकाणाची माहिती दिली. तसेच अवैध वाहतुक होणार नाही, याकरिता तेलंगानाच्या बाजुला जे चोरवाटांचे रस्ते आहेत, अशा रस्त्यांवर वनउपज तपासणी नाक्याची निर्मीती करण्यात येणार असल्याचे सांगीतले. आंतरराज्यीय समन्वय सभेमध्ये तेलंगणातील एफडीओ सी. वज्रारेड्डी, आरएफओ एम. कमला, व्येकंटेश्वर राव, वनपाल व वनरक्षक तसेच सिरोंचा वनविभागातील उपवनसंरक्षक पूनम पाटे, पी.एम.पाझारे, आसरअल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एम. तोकला, चिलकर यांच्यासह वनपाल व वनरक्षक असे दोन्ही राज्यातील एकूण 50 अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. अशी माहिती उप वनसंरक्षक पूनम पाटे यांनी कळविले आहे.