परीक्षांचे निकाल जाहीर करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार : अभाविप

– कुलगुरुंना निवेदनातून इशारा
GADCHIROLI TODAY
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत विविध अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल विद्यापीठ प्रशासनाने त्वरीत लावण्यासह विविध मागण्यांचे निवेदन कुलगुरु डॉ. बोकारे यांना सादर करण्यात आले. सोबतच विद्यार्थ्यांच्या समस्या तत्काळ मार्गी लावा, अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही दिला आहे.
कुलगुरुंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठ परीक्षा शुल्क किमान पाच वर्ष कायम ठेवावे त्यात प्रत्येक शैक्षणिक क्षेत्रात वाढ नये, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित अनेक महाविद्यालयांमध्ये प्राचार्य पद रिक्त असून अनेक महाविद्यालय कार्यकारी प्राचार्याच्या भरवशावर चालतात. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ प्राचार्यांची नियुक्ती करण्यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने पावले उचलावीत, विद्यापीठअंतर्गत अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये एकही पूर्णवेळ प्राध्यापक नसतानासुद्धा अशा महाविद्यालयाला विद्यापीठातर्फे प्रवेशाची मान्यता दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारे अनुभव ज्ञान गुणवत्तापूर्ण राहत नाही. त्यामुळे पूर्णवेळ प्राध्यापक नसलेल्या अशा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना संलग्निकरण देऊ नये तसेच अशा महाविद्यालयांवर कारवाई करावी, विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या उत्तरपत्रिका त्यांच्या लॉगिन आयडीवर दाखवण्यात यावा यामुळे विद्यार्थ्यांना गुणपत्रिका रिचेकिंगसाठी आर्थिक भूर्दंड पडणार नाही, ज्या विषयात विद्यार्थी हा नापास झालाय त्याच विषयांचे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यात यावे, पूर्ण विषयाचे शुल्क घेऊन विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करु नये, विद्यापीठाचे परिपत्रक व नोटिफिकेशन विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठविण्यात यावे, परीक्षा होऊन बराच काळ होऊन निकाल जाहीर करण्यात आले नाही, तसेच रेचेकिंगचे सुद्धा बरेच निकाल विद्यापीठाकडून लावण्यात आलेले नसताना महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सांगितले जात आहेत. यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले असून विद्यापीठाने तत्काळ उर्वरित परीक्षांचे निकाल जाहीर करावेत, अन्यथा अभाविपतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यापीठ प्रशासनाला निवेदनातून देण्यात आला. यावेळी शिष्टमंडळात अभाविपचे प्रदेश मंत्री शक्ती केराम, सिनेट सदस्य यश बांगडे, प्रांत सोशल मीडिया सहसंयोजक जयेश ठाकरे, नगर सहमंत्री हिरालाल नुरूती, भाग संयोजक तुषार चुधरी, राहूल श्यामकुवर आदींसह अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.