अहेरी तालुक्यातील ‘या’ पाच ग्रापंच्या रिक्त पदांसाठी होणार निवडणूक

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : राज्यभरातील विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायतीतील सदस्य आणि थेट सरपंचाच्या रिक्तपदाच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 6 एप्रिल रोजी घोषित केला आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींतील सरपंच व सदस्य पदासाठी 18 मे रोजी प्रत्यक्ष पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगातर्फे अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत नागेपल्ली, पल्ले, व्येंकटरावपेठा, रेगुलवाही व मेडपल्ली येथिल रिक्त सदस्य पदाकरीता निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच या निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. निवडणूकीसाठी शिलेदार रिंगणात उतरविण्यासाठी राजकीय पदाधिका-यांद्वारे उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. तर उमेदवारीसाठी आपलाच क्रमांक लागावा म्हणून उमेदवारही राजकीय पदाधिका-या हेरझ-या मारतांना निदर्शनास येत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत संबंधित गावात राजकीय वातावरण तापू लागले आहे.
निवडणूक कार्यक्रम
अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत नागेपल्ली (प्रभाग क्र. 5 अनु. जमाती स्त्री राखीव), पल्ले(प्रभाग क्र. 1 अनु. जमाती स्त्री राखीव व प्रभाग क्र. 3 अनु. जमाती), व्येंकटरावपेठा (प्रभाग क्र. 2 अनु.जमाती स्त्री राखीव), रेगुलवाही (अनु. जमाती) व मेडपल्ली (अनुसूचित जमाती) इत्यादी आणि प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात येणार आहे. तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा 18 एप्रिल (मंगळवार), नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ 25 एप्रिल ते 2 मे वेळ सकाळी 11 ते दु. 3 वाजेपर्यंत, नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्याचा दिनांक व वेळ 3 मे रोजी सकाळी 11 वाजतापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी 8 मे रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.