पाणी टंचाईचे संकट टाळण्यासाठी उगारला कारवाईचा बडगा; विविध वॉर्डातील १० टुल्लू पंप जप्त

GADCHIROLI TODAY
कोरची : शहरातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता, नगरपंचायत प्रशासनाने वैयक्तिक व सार्वजनिक नळाला लावलेले १० टुल्लू पंप जप्त केल्याची कारवाई केली.
कोरची शहरातील नागरिकांना मुनादी व नोटीसद्वारे नळाला टुल्लू पंप न लावण्याबाबत सूचना दिल्या होत्या. परंतु, काही नागरिकांनी पंप न काढल्याने नगरपंचायतीने कारवाईचा बडगा उगारला. मार्च महिन्यातच शहारातील पाण्याची पातळी खालावली असून पाणी टंचाईचा सामना नागरीकांना करावा लागू नये , यासाठी विविध वॉर्डातील १० पंप जप्त करण्यात आल्याची माहिती नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी बाबासो हाक्के यांनी दिली. तसेच एप्रिल व मे महिन्यात शहरवासीयांनी पाणी जपून वापरावे व पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन नगरपंचायतकडून करण्यात आले आहे. सदर कारवाई नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी बी.व्ही.हाक्के, जयपाल मोहुले, नरेंद्र कोतकोंडावार, रवी मडावी, विजय जोगठे, आशिष राघोते व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केली.