आसरअल्ली सर्कलमध्ये 16.8 मिमी पावसाची नोंद ; पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढणार

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : जिल्ह्यातील मागील 24 तासात सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली सर्कलमध्ये 16.8 मिमी तर जिल्ह्यात सरासरी 0.6 पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक सिरोंचा तालुक्यात 6.9 मिमी, कोरची तालुक्यात 0.6 मिमी पाऊस कोसळला.
हवामान विभागाने दिलेल्या इशा-यानुसार जिल्ह्याच्या काही भागात दोन दिवस हलक्या सरी कोसळल्या. तर अनेक भागाला वादळी पावसाचा तडाखा बसला. दरम्यान, आज सकाळपासूनच ढगाळी वातावरण व वारा वाहत असल्याने उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र ढगाळी वातावणामुळे धान, मका, भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे.
मागील महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांना फटका बसला होता. त्यातून सावरत नाही तोच पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने शेतक-यांची चिंता वाढली होती. दोन दिवस जिल्ह्याच्या काही भागात वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उन्हाळी धान, मका, भाजीपाला, मिरची, आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, आज दिवसभर ढगांची उघडझाप सुरु होती. मात्र पाऊस कोसळला नाही. ढगाळी वातावरण व गार वा-यामुळे उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.