गर्भावस्थेतील धान पिक करपले ; शेतकऱ्यांचे विद्यूत जनित्रासमोरच ठिय्या आंदोलन

GADCHIROLI TODAY
आरमोरी : तालुक्यातील पळसगाव येथील विद्यूत जनित्रामध्ये तांत्रिक बिघाड होऊन कृषीपंपाचा विद्यूत पुरवठा मागील काही दिवसांपासून ठप्प पडला आहे. मात्र महावितरणतर्फे कोणतीही उपाययोजना न केल्याने पाण्याअभावी शेतक-यांच्या धान पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे महावितरणप्रती संताप व्यक्त करीत पळसगाव येथील शेतक-यांनी 8 एप्रिल रोजी जिल्हा कॉंग्रेसचे दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात विद्यूत जनित्रासमोरच ठिय्या आंदोलन पुकारला.
पळसगावसह परिसरातील अनेक शेतक-यांनी ऊन्हाळी धान पीक हाती घेतले आहे. सद्यस्थितीत पीक गर्भावस्थेत असल्याने या पिकांना पाण्याची नितांत आवश्यक आहेत. मात्र पळसगाव शेतशिवारातील कृषी पंपाचे विद्युत जनित्र काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे बिघडल्या गेले. यामुळे कृषीपंपाला विद्युत पुरवठा ठप्प पडला आहे. पाण्याअभावी शेतीला भेगा पडून जवळपास 25 शेतक-यांचे धान पीक करपल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विद्यूत जनित्र बिघाड संदर्भात वीज वितरण कंपनीच्या शाखा अभियंत्यांना वारंवार विनंती करुनही कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक-यांनी आज, शनिवारी सकाळच्या सुमारास नादुरुस्त जनित्रासमोर ठिय्या आंदोलन पुकारित महावितरण विभागाप्रती तीव्र रोष व्यक्त केला. जोपर्यंत जनित्र दुरुस्त होणार नाही, तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्धार त्यांनी केला. मात्र महावितरणचे अधीक्षक अभियंता डोंगरवार यांनी तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन देताच शेतक-यांनी आंदोलन मागे घेतले.
यावेळी आंदोलनात कॉंग्रेसचे दिलीप घोडाम, सचिन मने, संजय सेलोकर, प्रविण ढोरे, राजु चौके, दिनकर सेलोकर, युवराज धोटरे, मूखरु तितीरमारे, राजु ढोरे, प्रकाश सेलोकर, देवनाथ झलके, बाळकृष्ण नखाते, सदानंद नखाते, पराग सेलोकर, फाल्गून बगमारे, राजु सेलोकर, पितांबर ढोरे, मनु चौके, दिलीप चौके, बाबुराव दुपारे, भास्कर सेलोकर आदी शेतकरी उपस्थित होते.