भाजीपाला व्यवसायिकाचा आकस्मिक मृत्यू

GADCHIROLI TODAY
कोरची : तालुक्यातील सातपुती येथे लग्न समारंभ आटोपून परतीच्या प्रवासात असलेल्या इसमाच्या छातीमध्ये अचानक वेदना होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी, सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. हरिदास रामचंद्र गुरनुले रा. कोरची असे मृतकाचे नाव असून ते भाजीपाला व्यवसायिक होते.
प्राप्त माहितीनुसार, कोरची येथील हरिदास रामचंद्र गुरनुले यांचा भाजीपाल्याचा व्यवसाय होता. ते सातपुती येथील विवाह समारंभ आटोपून कोरची शहराकडे प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान, अचानक त्यांच्या छातीमध्ये वेदना होऊ लागल्याने ते झाडाखाली थांबले. मात्र, प्रकृती जास्त बिघडल्याने ते झाडाखालीच पडले. या प्रकाराबाबतची माहिती सातपूतीच्या लोकांनी गुरनुले यांच्या कुटुंबियांना दिली. घरच्या लोकांनी ताबडतोब त्यांना कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु, प्रकृती खालावत असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रेफर करण्याचे डॉ. इटनकर यांनी सांगितले. रेफर स्लीप भरत असतांनाच त्यांची प्राणज्योत मावळली. मृतक हरिदास गुरनुले यांच्या पश्चात पत्नी आणि 3 मुली असा आप्त परिवार आहे. या निधनामुळे गुरनुले कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले. या घटनेमुळे संपूर्ण कोरची शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.