दारूविक्रेत्यांना असा शिकवला धडा की, दारूविक्रीमुक्तच झाले गाव

GADCHIROLI TODAY
-चीपुरदुब्बा येथे उभारला विजयस्तंभ
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील चीपुरदुब्बा येथील मुक्तिपथ गाव संघटनेने दारूविक्रेत्यांना धडा शिकवून गावाला मागील चार वर्षांपासून दारूविक्रीमुक्त ठेवले आहे. या कार्यातून इतरही गावांना प्रेरणा मिळावी, यासाठी नुकतेच गावात विजयस्तंभ उभारण्यात आले आहे.
चीपुरदुब्बा गावात मागील चार वर्षांपूर्वी अवैध दारूविक्री सुरु होती. गावात दारूविक्री बंदीसाठी महिलांनी मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली लढा देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार नियमित बैठका घेऊन गावाला दारूविक्रीमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी करीत गावातील महिलांनी दारूविक्रेत्यांना वारंवार सूचना करून अवैध व्यवसाय थांबवण्याचे आवाहन केले. दारूविक्रेत्यांविरोधात पोलिस तक्रार देखील करण्यात आली. मात्र, एका विक्रेत्याने चोरट्या मार्गाने अवैध व्यवसाय सुरूच ठेवला होता. याबाबतची माहिती मिळताच गाव संघटनेच्या महिलांनी संबंधित विक्रेत्याची दारू नष्ट करून चांगलाच धडा शिकवला. तेव्हापासून आता चार वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असून अवैध दारूविक्रीमुक्त गाव म्हणून या गावाने ओळख प्राप्त केली आहे. नुकतेच या गावाने विजयस्तंभ उभारून गावाची दारूबंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाला गावातील सरपंच मंजुला चेदम, शाळा मुख्याध्यापक एन. जी. आत्राम, प्रतिष्ठित नागरिक, गाव संघटन महिला, मुक्तीपथ तालुका चमू व ग्रामस्थ उपस्थित होते.