पोलिस विभागाच्या पुढाकारातून ई-लर्निंग स्कुल प्रोजेक्ट : विद्यार्थ्यांना ‘या’ अभ्यासक्रमांचे मिळणार धडे

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ई-लर्निंगच्या माध्यमातून धडे घेता यावे, यासाठी गडचिरोली पोलीस दल, आदर्श मित्र मंडळ पुणे व लक्ष्मीनृसिंह पतसंस्था, बल्लारशा यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कल्याण अंतर्गत असलेल्या सरस्वती विद्यालयामध्ये ई-लर्निंग स्कुल या पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्याहस्ते करण्यात आला. या उपक्रमातून शालेय व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजून घेण्यास सोपे जाणार आहे.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून प्रोजेक्ट उडाण सर्वकष सक्षमीकरण हा उपक्रम युवकांना रोजगार, कला, साहित्य व खेळ यामध्ये संधी प्राप्त करुन देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत ‘एक गाव एक वाचनालय’ या योजनेतंर्गत विविध ठिकाणी वाचनालय निर्माण करण्यात आले आहे. या वाचनालयातील विद्यार्थ्यांना ई-लर्निंग स्कुलचा लाभ घेता येणार आहे. या प्रोजेक्टमध्ये इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या सर्व विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ठ आहे. तसेच ६५० सायन्स प्रोजेक्ट, स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रमाचाही समावेश आहे. संपूर्ण अभ्यासक्रम चित्रांकीत तसेच ध्वनिमुद्रीत केला असल्याने विद्यार्थ्यांना समजून घेण्यास सोपे आहे.
कार्यक्रमादरम्यान, पोमके कोटगुल व अतिसंवेदनशिल अशा पोमकें नारगुंडा येथील वाचनालयामध्ये ई-लर्निंगचे धडे विद्यार्थ्यांना घेता यावे म्हणून टीव्ही संच वाटप करण्यात आले आहे. सदर उद्घाटन सोहळ्यास अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख तसेच आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप, लक्ष्मीनृसिंह पतसंस्था, बल्लारशाचे श्रीनिवास सुंचुवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी नरेंद्र पिवाल, अंमलदार तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील, अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.
६० वाचनालय निर्मीतीचे काम प्रगतीपथावर
‘एक गाव एक वाचनालय’ या योजनेतंर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धापरिक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी तसेच त्यांच्या उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी, यासाठी पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून दुर्गम व अतिदुर्गम भागातील एकुण २६ पोस्टे, उपपोस्टे, पोमकें या ठिकाणी नवीन सुसज्ज व आधुनिक सार्वजनिक वाचनालयाची निर्मीती करण्यात आलेली आहे. सोबतच ६० विविध ठिकाणी वाचनालयाची निर्मीती करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे.