सावधान, हा प्रवास नवख्या वाहनधारकांसाठी धोकादायक

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील कन्हाळगाव-धुसानटोला या रस्त्याचा काही भाग पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टीने वाहून गेला होता. त्यामुळे रस्त्यावर भलामोठा खड्डा निर्माण होऊन वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. यासंदर्भात अनेकदा लक्ष वेधूनही सदर खड्डा ‘जैसे थे’ असल्याने नवख्या वाहनधारकांसाठी या रस्त्यावरील प्रवास जीवघेणा ठरू शकतो.
धानोरा तालुक्यातील कन्हाळगाव पासून ५०० मीटर अंतरावर धुसानटोला मार्गावर बंधारा बांधलेला आहे.सततच्या अतिवृष्टीने बंधाऱ्याच्या पाण्याने प्रवाहाचा मार्ग बदलला आणि बाजूने रस्ता वाहून गेल्याने रस्ता दिसेनासा झाला. या रस्त्यावर निर्माण झालेल्या मोठ्या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे रस्त्याची क्षमता अधिकच खालावली आहे. हल्ली रस्त्याची अवस्था बघितली असता, रस्त्यावरील डांबरीकरण उखडले असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर वाहतूक किंवा प्रवास करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील खोलवर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मात्र, अद्यापही सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही.
सदर रस्त्यावरील खड्डा नवीन वाहनधारकांना लक्षात येत नाही. अशावेळी वाहन सरळ खड्ड्यात पडून वाहकाचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर खड्डा तत्काळ बुजवण्याची मागणी ग्रापंचे उपसरपंच संजय पदा, ग्रामसभा सदस्य प्रशांत कोडाप,माजी सरपंच तुकाराम हुर्रा, माजी सरपंच लालाजी पदा, आकाश पदा, संदीप रामदास हुर्रा, मोतीराम कोडाप, सीताराम हुर्रा, गणेश कुमोटी, समिल पदा, अंजना पदा, परबता पदा यांनी केली आहे.