‘या’ मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्याने जिपपुढे केले ‘मुंडण’

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड, अहेरी, मुलचेरा या तीन तालुक्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत कोट्यवधींचे बोगस काम व काम न करता पैशाची उचल केल्याचे चौकशी अहवालात सिद्ध होऊनही त्या २३ अधिकारी व ग्रामसेवकावर अद्यापही कारवाई न झाल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी जिप समोर आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाच्या १६ व्या दिवशी आंदोलनकर्ते निळकंठ संदोकर यांनी मुंडण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, अहेरी, मुलचेरा या तीन तालुक्यात रोहयो अंतर्गत कोट्यवधी रुपयाचे बोगस काम व काम न करता पैशाची उचल केल्या संदर्भातील तक्रार सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी केली होती. या प्रकरणात दखल घेत जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 6 सदस्यीय समिती गठित केली. सदर चौकशी समितीने प्रत्यक्ष कामावर जाऊन चौकशी केली, त्यानुसार भामरागड, अहेरी, मुलचेरा या तीन पंचायत समितीचे एकूण २३ अधिकारी व कर्मचारी दोषी आढळलेले आहेत. मात्र, अजूनपर्यंत संबंधित दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर उचित कारवाई झालेली नाही.त्यामुळे दोषी अधिकारी-कर्मचारी यांच्यावर तत्काळ बडतर्फची कार्यवाही करून सर्वांवर फौजदारी गुन्हे नोंद करा. या मागणीसाठी 27 मार्चपासून जिप कार्यालया समोर बेमुदत ठिय्या धरणा आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाच्या १६ व्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी मुंडन आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे. यावेळी आंदोलनास सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे, निळकंठ संदोकर, रवींद्र सेलोटे, धनंजय डोईजड, चंद्रशेखर सिडाम उपस्थित होते.