दोन दिवसांपासून बेपत्ता युवकाचा नदीकाठी आढळला मृतदेह

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : जिल्हा मुख्यालयानजीकच्या इंदाळा येथील साहिल रंजन जेंगठे हा दोन दिवसांपासून घरून बेपत्ता होता. दरम्यान, वैनगंगा नदीकाठाजवळ त्याचा मृतदेहच आढळून आल्याची घटना १२ एप्रिल रोजी उघडकीस आली. मात्र, मृत्यूचे कारण अद्यापपर्यंत कळले नसून साहिलची हत्या की आत्महत्या याचा शोध पोलिस घेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, साहिल हा 10 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घरून निघून गेला. सायंकाळ होवून तो घरी परत न आल्याने त्याच्या वडिलांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी साहिलचा नातेवाईकांकडे शोध घेतला असता, तो आढळून आला नाही. दरम्यान, बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीकाठाजवळ त्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. साहिलचा मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडल्याने पुढील तपास सावली पोलिस करीत आहेत.