लाच रक्कम स्वीकारणे पडले महागात ; एसीबीच्या सापळ्यात अडकला भामरागडचा अधिक्षक

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : मानधनात वाढ केल्याचा मोबदला म्हणून लाच रक्कमेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविणे भामरागड येथील समग्र शिक्षा अभियानाच्या वसतिगृहातील अधीक्षकास चांगलेच महागात पडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५ हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारणाऱ्या सदर अधिक्षकास रंगेहाथ पकडल्याची कारवाई आज १२ एप्रिल रोजी केली. भीमराव उद्धव अवतरे (५३) असे आरोपीचे नाव असून भामरागड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानधनात दरमहा ३ हजार रुपये पगार वाढ केल्याचा मोबदला म्हणून तसेच कंत्राटी चौकीदार या पदावर नियमित ठेवण्याच्या कामासाठी अधीक्षक आरोपी भीमराव अवतरे यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपये लाच रक्कमेची मागणी करून लाच रक्कम घेण्याची तयारी दर्शवली. मात्र, लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीच्या आधारे एसीबीच्या पथकाने सापळा रचून भामरागड येथील वसतिगृहातील विश्राम कक्षामध्ये अधीक्षक अवतरे याना लाच रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी भामरागड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांच्या कालावधीत एसीबीची ही दुसरी कारवाई असून मंगळवारी अमिर्झा येथील ग्रापं सरपंचासह सदस्यावर कारवाई करण्यात आली होती.
सदर कारवाई पोलिस उपअधीक्षक अनिल लोखंडे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड, सहायक फोजदार प्रमोद ढोरे, पोलिस हवालदार नथ्थू धोटे, राजू पदमगिरीवार, श्रीनिवास संगोजी, स्वप्नील बांबोळे, किशोर जोंजारकर, संदीप घोरमोडे, किशोर ठाकूर, संदीप उडाण, महिला पोलिस शिपाई विद्या म्हशाखेत्री, ज्योत्स्ना वसाके, तुळशीराम नवघरे यांनी केली.