मनरेगा घोटाळा : भीक मागून वेधले शासनाचे लक्ष

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : मनरेगा योजनेअंतर्गत कोट्यवधींचा घोटाळा करणा-या अधिकाऱ्यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी योगाजी कुडवे व पदाधिका-यांनी 27 मार्चपासून पासून जिप समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, दोषी अधिका-यांवर अद्यापही कारवाई न झाल्याने 12 एप्रिल रोजी उपोषणकर्त्यांच्यावतीने भीक मांगो आंदोलन करुन शासनाचा निषेध करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, अहेरी, मुलचेरा या तीन तालुक्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात बोगस काम आणि काम न करता पैशाची उचल केल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 6 सदस्यीय समिती गठीत करून चौकशी केली असता, तिनही तालुक्यातील काही अधिकारी/कर्मचारी या प्रकरणात दोषी आढळले आहेत. मात्र त्यांच्यावर अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दोषी अधिकाऱ्यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, जोपर्यंत दोषी अधिकारी, कर्मचा-यांवर बडतर्फीची कारवाही व फौजदारी गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. दरम्यान, आंदोलकांनी भीक मांगो आंदोलन करुन शासनाचा निषेध केला. आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे, नीलकंठ संदोकर, धनंजय डोईजड, रवींद्र सेलोटे, विलास भानारकर, मुनेश लडके, दीपक चींचोलकर, सचिन म्हशाखेत्री, आकाश मटाम्मी, देवेंद्र भोयर उपस्थित होते.