आंबेटोला वासियांचा अवैध दारूविक्री विरोधात विजय : गाव संघटनेने केले शर्तीचे प्रयत्न 

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : तालुक्यातील आंबेटोला गावातून १५ वर्षांपासून हद्दपार असलेल्या अवैध दारूने पुन्हा गावात प्रवेश करताच गावातील शांतता भंग झाली होती. या विरोधात मुक्तिपथ गाव संघटनेने शर्तीचे प्रयत्न करून लढा जिंकला. आता सलग २०१७ पासून हे गाव दारूविक्रीमुक्त गाव म्हणून नावारूपास आले आहेत.
आंबेटोला गावाची लोकसंख्या 825 एवढी आहे. गावामध्ये सन २००५ पूर्वी मोठ्या प्रमाणात दारूविक्री होत होती. त्यावेळी जवळपास 42 दारू विक्रेते होते. यामुळे भांडण, मारामाऱ्या, खून, चोरी अशा अनेक घटना घडल्या. त्यानंतर सन २००५ मध्ये गाव सभा घेऊन दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. गावात संघटना गठित करून निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरवात झाली. यामुळे गाव संघटनेला दारू विक्रेत्यांकडून धमक्या येत होत्या. तरी सुद्धा गाव संघटनेने निडरपणे विक्रेत्यांचा दारू साठा नष्ट करणे, वारंवार कृती करणे व कायदेशीर कार्यवाही करण्यास पोलिस विभागास सहकार्य करून दारूविकेत्यांना चांगलाच धडा शिकवला. अखेर दारूबंद झाली व गावात शांतता, सुव्यवस्था नांदायला लागली. सलग १५ वर्ष गाव संघटनेने गावातील दारूविक्री बंद ठेवण्यात यश मिळवले. अशातच सन २०१६ मध्ये एक-दोन विक्रेत्यांनी जंगल परिसराचा आधार घेऊन चोरट्या मार्गाने अवैध दारूविक्री सुरु केली. या अवैध व्यवसायाला आळा घालून गावातील दारूबंदी कायम टिकवून ठेवण्यासाठी पुन्हा २०१७ मध्ये मुक्तीपथ गाव संघटन गठित करून दारू विक्रेत्यांवर कार्यवाही करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत गावात दारू विक्री बंद आहे. मुक्तीपथ गाव संघटनेच्या माध्यमातून मिळालेल्या यशाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी नुकताच गावाने विजयस्तंभ उभारून आनंद व्यक्त केला आहे. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुक्तीपथ गाव संघटन सदस्य, नागरिक उपस्थित होते. यासाठी मुक्तिपथ अभियानाने वेळोवेळी मार्गदर्शन करून सहकार्य केले.