सावधान.. ! कोरोना पुन्हा डोके वर काढतोय ; ‘या’ तालुक्यात आढळले पाच बाधित

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : कोरोनाने डोके वर काढले असून गडचिरोली जिल्ह्यात बाधित रुग्णांची पुन्हा नव्याने नोंद होत आहे. कोरची तालुक्यात 5 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने नागरिकांसह तालुका प्रशासनाची चिंता वाढली असून आरोग्य विभाग सतर्क झाले आहे.
तालुक्यात मागील काही दिवसात सर्दी, खोकला तसेच घशाने त्रस्त असलेल्या नागरिकांची संख्या वाढत आहे. अशातच ग्रामीण रुग्णालय कोरची येथून काही रुग्णांचे आरटीपीआर तपासणीकरिता सॅम्पल गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले असता 9 तारखेला पाठविलेल्या 26 सॅम्पलपैकी 2 तर 10 तारखेला पाठविलेल्या 12 सॅम्पलमधून 3 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालय कोरची विभागाद्वारे देण्यात आली. कोरोना रुग्ण बाधित संदर्भात वैद्यकीय अधीक्षक यांना विचारणा केली असता त्यांनी तालुक्यात केवळ दोनच रुग्ण कोरोना बाधित असल्याची माहिती दिली. संबंधित बाधित रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. कोरची तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची नोद झाल्याने तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांना विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.