‘हा’ घाट ठरताहे जीवघेणा : ३० फूट दरीत कोसळली ट्रक

GADCHIROLI TODAY
कोरची : वळणाच्या उतारावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने बारा चक्का ट्रक ३० फूट दरीत कोसळल्याची घटना कोरची तालुक्यातील बेडगाव घाटावर बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे, या घाटावर अपघाताची मालिका सुरूच असून काही दिवसांपूर्वी दोन दुचाकीस्वारांना प्राणास मुकावे लागले होते.
कोरची तालुक्यातील बेडगाव घाटावरून जड वाहनांची रात्र-दिवस नेहमीच वर्दळ सुरू असते. सदर घाटावर अनेक अपघात झाले असून कित्येकांना आपले प्राण सुद्धा गमवावे लागले आहे. बुधवारी एमएच ४० बी. जी १७४९ क्रमांकाचे ट्रक हैद्राबादवरून मक्क्याची बिजाई भरून रायपुरला निघाली होती. मात्र, रात्रीच्या सुमारास बेडगाव घाटावरील पहिला चढाव चढल्यावर उतारावरील वळणावर वाहकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक ३० फूट दरीत जाऊन घुसली. यावेळी समोरून कुठलेही वाहन येत नसल्याने मोठा अपघात टळला.
काही दिवसांपूर्वी सदर घाटावर कंटेनरची टिप्परला समोरासमोर धडक झाली होती. या अपघातात दोन दुचाकीस्वार ठार तर एक गंभीर जखमी झाला होता. या अपघातामुळे वाहतूक ठप्प होऊन वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. सदर मार्ग हे राष्ट्रीय महामार्ग असून रायपुर – चंद्रपूर – हैद्राबादला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. यामुळे सदर मार्गावरून नेहमीच अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते.