गडचिरोली जिल्ह्याच्या शिरापेचात मानाचा तुरा ; नक्षलप्रभावित रोमपल्लीच्या महेशची अंडर 19 हॉकी स्पर्धेसाठी निवड

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : दुर्गम भागात खडतर परिस्थितीत विविध आव्हानांना सामोरे जात आपल्या खेळाप्रती श्रद्धा असणा-या आदिवासी विद्यार्थ्यांने प्रतिकुल परिस्थितीत केवळ जिद्द आणि मेहनत याची सांगड घालित जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेल्या सिरोंचा तालुक्यातील नक्षल प्रभावित, अतिदुर्गम, अशा रोमपल्ली येथील महेश इरपा मडावी या विद्यार्थ्याने हॉकीत कौशल्य दाखवित थेट देश पातळीवरील अंडर 19 हॉकी स्पर्धेसाठी आपली निवड सार्थ ठरविली आहे. त्याच्या या यशाने पुन्हा एकदा आदिवासीबहूल गडचिरोली जिल्ह्याच्या शिरापेचात मानाचा तुरा रोवल्या गेला आहे.
नक्षलप्रभावित म्हणून ओळखल्या जाणा-या सिरोंचा तालुक्यातील ग्राम पंचायत मादाराम हद्दीत रोमपल्ली ही छोटीशी आदिवासीबहूल गाववस्ती. या गावात महेश मडावी याचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण सिरोंचा येथील ज्ञानदिप इंग्लिश मिडियम स्कुल येथे घेतल्यानंतर इयत्ता 6 वी ते 8 वीचे शिक्षण चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथील दिव्यानी इंटरनॅशनल स्कुल येथे शिक्षण सुरु होते. लहानपणापासूनच महेशला खेळाची आवड होती. खेळावरील नितांत प्रेमापोटी त्याने हॉकीची स्टिक हाती घेतली. दरम्यान 9 वीत शिक्षण घेत असतांना पुणे येथील क्रीडा प्रबोधिनी येथे त्याने हॉकीचे कौशल्य अवगत केले. त्याच्या अंगी असलेले क्रीडा कौशल्य बघून त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली. दरम्यान नुकताच छत्तीसगड येथे पार पडलेल्या हॉकी स्पर्धेत त्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडविले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल थेट देशाच्या हॉकी संघाने घेतली आहे. अंडर 19 हॉकी स्पर्धेकरिता त्यांची निवड सार्थ ठरविली आहे.
नक्षलप्रभावित, आदिवासीबहूल भागातील विद्यार्थ्यांच्या हाती साधने नाहीत, बड्या खेळ संस्थांचा पाठिंबा नाही, अमाप शुल्क भरून मिळणारे खेळाचे तांत्रिक प्रशिक्षण नाही, अशा परिस्थितीतही केवळ खेळाप्रती असलेली श्रद्धा, जिद्द, चिकाटीच्या भरवशावर एका आदिवासी विद्यार्थ्याने थेट देशभपातळीवरील स्पर्धेत महेशने आपली निवड सार्थ ठरविल्याने, निश्चितच ही बाब गडचिरोली जिल्ह्यासाठी गौरवाची बाब ठरली आहे.