खाजगी डॉक्टरवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला

GADCHIROLI TODAY
कोरची : खाजगी डॉक्टरवर एका व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना 15 एप्रिलला सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास तालुक्यातील कोटगूल येथे घडली. यामध्ये डॉक्टर गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संजय बिश्वास असे जखमी डॉक्टरचे नाव आहे.

कोटगूल येथे मिथून तांबेकर यांच्या किराणा दुकानामध्ये ते 15 एप्रिल रोजी बसलेले होते. सोनपूर येथील मानक काटेंगे (46) हा किराणा दुकानात आला. पाठीमागून त्याने अचानक डॉ. संजय बिश्वास यांच्यावर सुरीने हल्ला केला. पाठीवर तर एकदा मानेवर गंभीर जखम झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. नागरिकांनी धाव घेत मानक काटेंगे याच्या तावडीतून डॉ. बिश्वास यांची सुटका केली. त्यानंतर त्यांना कोटगूलच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिश टेकाम व चमूने प्रथमोपचार करुन त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले. हल्ल्यामागील नेमके कारण स्पष्ट होवू शकले नाही. दरम्यान, मानक काटेंगे यालाही जखम झाली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सुरी जप्त करुन त्यास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास पोलिस निरीक्षक अमोल फडतरे करीत आहेत.