शेतातील विहिरीमध्ये पडलेल्या हरणाला जीवदान

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : पोर्ला वनपरिक्षेत्रातील किटाळी नियतक्षेत्रातील आकापूर येथील वामन रामचंद्र झरली यांच्या शेतातील विहिरीमध्ये पडलेल्या हरणाला पोर्ला वनपरिक्षेत्र अधिका-यांच्या तत्परतेमुळे सुखरूप बाहेर काढून जीवदान देण्यात यश आले.
आकापूर येथील वामन झरली यांच्या शेतातील विहिरीमध्ये सकाळी 6 वाजताच्या सुमारास हरिण पडले असल्याची माहिती संयुक्त वन व्यवस्थापन समिती किटाळीचे अध्यक्ष वामन झरली यांनी वनपरिक्षेत्र कार्यालय पोर्ला येथे दिली. माहिती मिळताच पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. मडावी यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठून पाहणी केली. हरिण विहिरीमध्ये पडून असल्याचे निदर्शनास येताच त्यानी तत्काळ वन्यजीव विभाग वडसा यांच्याशी संपर्क साधला. वनरक्षक संदीप तिजारे व वाहन चालक मनान शेख यांनी किटाळीचे वनरक्षक एस. जी. लामकासे व चमूच्या सहाय्याने हरणाला यशस्वीरित्या विहिरीतून बाहेर काढले व जंगलात सोडले. अशाप्रकारची कोणतीही घटना घडल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी मडावी यांनी यावेळी केले.