चामोर्शीतील तिरुपती हॉटेलमधून अवैध दारूविक्री ; पोलिसांनी केली कारवाई

GADCHIROLI TODAY

चामोर्शी : गडचिरोली मार्गावरील हॉटेल तिरुपती येथे चामोर्शी पोलिसांनी धाड टाकून 3 हजार 440 रुपयाची दारु जप्त केल्याची कारवाई रविवारी दुपारच्या सुमारास केली. याप्रकरणी संजय पोचन्ना येलकावार (60) रा. तेलंग मोहल्ला चामोर्शी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, बऱ्याच दिवसांपासून संजय येलकावार हे चामोर्शी- गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर आपले तिरुपती हॉटेल चालवित आहेत. यासोबतच कॅटर्सचे ऑर्डर सुद्धा ते घेत असतात. या हॉटेलमध्ये दारु मिळत असल्याची माहिती चामोर्शी पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी आज दुपारच्या सुमारास हॉटेलवर छापा टाकला असता, हॉटेलच्या मागच्या बाजूला असलेल्या बाथरूममध्ये एका नायलॉन थैलीच्या आत हिरव्या रंगाच्या कापडी पिशवीमध्ये 3440 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या 43 नग प्लास्टिक निपा आढळून आल्या. तसेच हॉटेलमधील टेबलवर विदेशी दारुच्या रिकाम्या बॉटल सुद्धा आढळून आल्या. पोलिसांनी सर्व दारु जप्त करून संजय येलकावार याच्यावर गुन्हा दाखल केला. सदर कारवाई पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्या मार्गदर्शनात नापोशि जीवन हेडाऊ, अंमलदार पोहवा राजेश गणवीर यांनी पार पाडली. या कारवाईमुळे चामोर्शीतील लहान, मोठ्या हॉटेल धारकांचे धाबे दणाणले आहेत.