सर्च रुग्णालयात मेंदूविकार व कर्क रुग्णांसाठी उपचाराची सुविधा

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात २० एप्रिलला कर्करोग ( Cancer) तर २२ एप्रिलला मेंदूविकार ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी या ओपीडीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन कर्करोगावर उपचार घेणे महागडे ठरते. गरीब व गरजूंवर जवळच्या भागात रोगाचे निदान व ऊयचार करता यावे, याकरिता सर्च रुग्णालयात कॅन्सरची ओपीडी सुरू करण्यात आली आहे. गुरुवार २० एप्रिल ला कर्करोग ओपीडी आयोजित केली असून नागपुरचे तज्ञ डॉ.सुशील मांनधनिया हे दर महिन्याच्या तिसर्‍या गुरुवारी कर्क रुग्णांची तपासणी करतील. स्तनांचा रंग बदलणे, स्तन लटकणे, गाठ येणे किंवा आकार बदलणे ही सर्व स्तंनाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. त्याचप्रमाणे श्वास लागणे अशक्तपाणा आणि थकवा जाणवणे, स्नायू आणि हाडे दुखणे ही सर्व फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. ही लक्षणे असणार्‍यांनी ओपीडीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
समाजामध्ये असंसर्गजन्य रोगाचे प्रमाण वाढत आहे. स्ट्रोक (अर्धांगवायू, पॅरालिसिस) यासारखे मेंदूविकार अकस्मात होणार्‍या मृत्यूसाठी करणीभूत ठरत आहेत. आता सर्च रुग्णालयात नागपुर येथील मेंदूविकार तज्ञांद्वारे तपासणी सुविधा उपलब्ध होणार आहे. मेंदूविकार ओपीडी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी आयोजित करण्यात येत असून, शनिवार २२ एप्रिल २०२३ ला मेंदूविकार तज्ञ डॉ. ध्रुव बत्रा यांच्याकडून रुग्णांची तपासणी करण्यात येईल. या ओपीडीमध्ये स्ट्रोक (अर्धांगवायू, पॅरालिसिस) बरोबरच झटक्यांचा (मिरगी) आजार, विविध मज्जातंतूचे आजार, पार्किंन्सन आजार, अल्जायमर आजार, जुनाट डोकेदुखी, लहान मुलांचे मेंदूचे आजार, चक्कर येण्याचे अनेक आजार, मद्यपानामुळे होणारे मेंदूविकार अशा अनेक आजारांवर तज्ञ डॉक्टरांच्या सल्ला व उपचार मिळणार आहे. या सुविधेचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ करून घ्यावा, असे आवाहन सर्च रुग्णालयातर्फे करण्यात आला आहे.