गावागावात पोहचला ‘व्हिडीओ व्हॅन’चा आवाज ; लघु चित्रपटाने वेधले लक्ष्य

– कोरची तालुक्यात जनजागृती
GADCHIROLI TODAY
कोरची : शहरी तथा ग्रामीण भागातील नागरिक, युवक व विद्यार्थ्यांना दारू व तंबाखू सेवनाने होणारे नुकसान ज्ञात व्हावे, यासाठी कोरची शहरासह विविध गावांमध्ये व्हिडीओ व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे, मुक्तिपथ अभियानाच्या ‘शाब्बास रे गण्या’ या लघु चित्रपटाने अनेकांचे लक्ष्य वेधून घेतले होते.
ग्रामीण भागातील लोकांसह शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूचे व्यसन जळले आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आरोग्यास हानिकारक असल्याने शासनाने तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली आहे. याबाबत गावखेड्यासह शाळांमध्ये संदेश देण्यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे व्हिडीओ व्हॅनचा उपक्रम सुरु आहे. आतापर्यंत सदर व्हॅन जिल्ह्यातील अतिदुर्गम, दुर्गम, ग्रामीण व शहरातही पोहचली आहे. या व्हॅनच्या माध्यमातून ‘यमराजाचा फास’, ‘शाब्बास रे गण्या’ यासह विविध मनोरंजनात्मक लघु चित्रपट दाखवून दारू व तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले जात आहे.
कोरची शहरातील विविध वार्डात, भीमपूर, बेडगाव, कोचिनारा, बोरी, मोठाझेलीया, मरारटोला यासह विविध गावांतील, शाळा, सार्वजनिक चौकात, आठवडी बाजारात व इतर ठिकाणी व्हिडीओ व्हॅन लावून जनजागृती करण्यात आली. त्याअनुषंगाने चौकात गोळा झालेल्या लोकांना दारू व तंबाखूमुळे कोणते नुकसान होतात, शारीरिक बदल दिसून आल्यास मुक्तिपथ तालुका कार्यालयात सुरु असलेल्या क्लिनीकला भेट देण्याचे आवाहनही करण्यात आले. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटिका निळा किनाके यांनी दारू, तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणामांची माहिती देत व्यसनापासून दूर राहण्यासंदर्भात मार्गदर्शन केले