दुचाकीस्वारांवर 356 गुन्हे दाखल ; अल्पवयीन मुलांना वाहने देऊ नये, अन्यथा कारवाई -पोलिस निरीक्षक खांडवे

GADCHIROLI TODAY
चामोर्शी : वाहतूक पोलिस विजय केंद्रे यांनी जानेवारी 2022 ते मार्च 2023 पर्यंत अल्पवयीन मुले विनापरवाना वाहने चालविणे, तिप्पट सीट बसवून वाहन चालवणे आदींवर 356 गुन्हे दाखल करीत 2 लाख 6 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुले, मुली व काहीजण विनापरवाना वाहने चालवित असल्याने अपघाताच्या घटनात वाढ होत आहे. त्यामुळे पालकांनी अल्पवयीन मुलांना विनापरवाना वाहने देऊ नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत व इतर वेळेस बरेच नागरिक, कर्मचारी बाहेरगावी जातात तीच संधी साधत चोरटे घरफोडी करतात. त्यामुळे बाहेरगावी जाण्याची सुचना पोलिस प्रशासनाला दिली तर घरांची पाळत ठेवता येणे शक्य होईल. नगर पंचायतीने शहरातील मुख्य ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवून शहरात होणारे अवैध कारवायांवर आळा बसविण्यात सहकार्य केल्यास चोऱ्यांच्या प्रमाणावर आळा घालण्यासाठी मदत मिळणार आहे. चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी केले आहे. सोबतच शहरातील भोजनालय रात्री 11.30 वाजेपर्यंत, हॉटेल, पानठेले, चायनीज दुकान आदी दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु ठेवावी. शहरात थोर महापुरुषांचे व इतर बॅनर लावतांना नप प्रशासनाची परवानगी घ्यावी, तसेच महा पुरुषांच्या बॅनरची छेडछाड व अनुचित प्रकार होणार नाही याची बॅनर लावणाऱ्यानी ही दक्षता घ्यावी. असेही पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी सांगितले .
अवैध कारवायांवर नियंत्रण ठेवण्यात यश
ठाणे हद्दीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, उप विभागीय पोलिस अधिकारी प्रनिल गिल्डा यांचे मार्गदर्शनात शहरात पोलिसाचे ‘गुडमॉर्निंग’ पथक व रात्रीची गस्त सुरू असल्यामुळे अवैध कारवायांवर नियंत्रण ठेवण्यात यश आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी दिली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक सुधीर साठे उपस्थित होते.