पीएचडी फेलोशिप संदर्भात निश्चित नियमावली तयार करा, अन्यथा आंदोलन : अभाविपची मागणी

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य शिक्षण व संशोधन संदर्भात अग्रेसर राहिले आहे. संशोधनास चालना देण्यासाठी महाराष्ट्रातील बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय या चार संस्था विविध समाज घटकातील संशोधन करणाऱ्या विद्यार्थांना फेलोशिप देतात. या संस्थाच्या संशोधन फेलोशिप नियमावलीमध्ये मोठी तफावत दिसून येते. त्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र सरकारने या संस्थाच्या पीएचडी फेलोशिप संदर्भात एक निश्चित नियमावली तयार करावी, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिला आहे.
सर्व संस्थांमधील संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यात यावी, फेलोशिप रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा कालावधी निश्चित करावा, प्रत्येक संस्थेचे विभागानुसार उपकार्यालय असावे, या सर्व संस्थांच्या फेलोशिप संदर्भात नियमावली बनवण्यासाठी महाराष्ट्र संशोधन परिषदेची स्थापना करण्यात यावी व या परिषदेच्या माध्यमातून संशोधन गुणवत्तेचे नियमन केले जावे, खुल्या (ओपन) प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना अमृत संस्थेकडून तत्काळ संशोधन फेलोशिप देण्यात यावी, संशोधन टिकून राहण्यासाठी फेलोशिप संदर्भात असलेल्या अडचणी दूर करणे महत्त्वाचे असून सरकारने या मागण्यांचा विचार करून त्याची पूर्तता करावी. सर्व मागण्याचा महाराष्ट्र सरकारने सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा. संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी चालना देत दिलासा द्यावा, मागण्या पूर्ण न झाल्यास अभाविप महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा अभाविपचे राष्ट्रीय मंत्री अंकिता पवार, विदर्भ प्रदेश मंत्री शक्ती केराम यांनी केली आहे