दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याला मिळाला आकार ; ८५ जणांची पोलीस दलात निवड

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम अतीदुर्गम भागातील बेरोजगार युवक-युवतींना शासकीय नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दल व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्यावतीने पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत १०७९ विद्यार्थ्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले होते. यातून दुर्गम भागातील ८५ जणांची जिल्हा पोलीस दलात निवड झाली असून त्यांच्या आयुष्याला आकार मिळाला आहे.
गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकी तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली / अहेरी / भामरागड व जिल्हा कौशल्य विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील युवक-युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षण व ईतर रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन त्यांना नोकरी मिळवण्याकरीता आत्मनिर्भर होण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण राबविले आहे. सदर पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणात एकुण सहा बॅचेसमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेले १०७९ विद्यार्थ्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये ८२० युवक व २५९ युवतींचा समावेश होता. ३० दिवसांचे निवासी प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांना मैदानी चाचणी व लेखी परीक्षाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस भरती करीता आवश्यक मैदानी चाचणीचे किट व लेखी परीक्षेकरीता आवश्यक पुस्तकांचा संच मोफत पुरविण्यात आले.
प्रशिक्षणाचे धडे गिरविलेल्या ८५ युवक-युवतींनी गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये मैदाणी चाचणी व लेखी परिक्षेत चांगले गुण मिळवुन, नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस चालक व पोलीस शिपाई पदाच्या तात्पुरत्या निवड यादीत यश संपादन केले आहे. यामध्ये गडचिरोली उपविभागातून १५, कुरखेडा ८, धानोरा ८, पेंढरी ५, एटापल्ली २, अहेरी १७ भामरागड ३, सिरोंचा १९ व जिमलगट्टा १० असे एकुण ८५ प्रशिक्षणार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अभिनंदन केले असुन त्यांच्या पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.